“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 15:38 IST2025-11-20T15:38:10+5:302025-11-20T15:38:10+5:30
Jammu Kashmir CM Omar Abdullah News: दिल्लीत गेले की मला भीती वाटत राहते की वाहन क्रमांक पाहून मला अडवतील आणि चौकशी करतील, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
Jammu Kashmir CM Omar Abdullah News: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाबाबत अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आय२० कार चालवणाऱ्या डॉ. उमर नबीने स्वतःलाही उडवून घेत स्फोट घडवला. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या उमर नबीचा एक व्हिडीओही काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आला. यानंतर आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक खंत व्यक्त केली आहे.
सध्याच्या परिस्थितीत पालक कदाचित त्यांच्या मुलांना बाहेर पाठवू इच्छित नसतील. जेव्हा आपल्याकडे चहुबाजूंनी संशयाने पाहिले जात आहे. दुसऱ्याच्या कृत्यांसाठी आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही लोकांच्या कृत्यांसाठी सर्वांना शिक्षा करण्याचा प्रयत्न केला जातो. तेव्हा बाहेर जाणे कठीण होते हे समजण्यासारखे आहे. दिल्लीत घडलेल्या घटनेला काही मोजकेच लोक जबाबदार आहेत. पण आपण सर्वजण त्यासाठी जबाबदार आहोत आणि आपण सर्वजण त्यात सहभागी आहोत असा आभास निर्माण केला जात आहे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
दिल्लीत बाहेर पडताना भीती वाटते
ओमर अब्दुल्ला म्हणाले की, ते राष्ट्रीय राजधानीत जम्मू आणि काश्मीरमध्ये नोंदणीकृत असलेले त्यांचे वाहन बाहेर काढण्यापूर्वी दोनदा विचार करतात. दिल्लीत जम्मू आणि काश्मीरमध्ये नोंदणीकृत असलेले वाहन चालवणे गुन्हा मानला जात आहे. जेव्हा माझ्यासोबत जास्त सुरक्षा कर्मचारी नसतात, तेव्हा मी मनात विचार करतो की, माझे वाहन बाहेर काढावे का? कारण मला माहिती नाही की कोणी मला थांबवेल आणि मी कुठून आहे किंवा मी तिथे का आहे असे विचारेल, असे अब्दुल्ला यांनी नमूद केले.
दरम्यान, १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या कार स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक, राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि गुन्हे शाखेने या स्फोटाचा तपास सुरू केला आहे. या स्फोटानंतर पोलिसांनी कडक सुरक्षेत फरीदाबादमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील ५०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे.