श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 09:13 IST2025-11-15T08:08:05+5:302025-11-15T09:13:02+5:30
श्रीनगरमधील नौगाम पोलिस ठाण्यात झालेल्या भीषण स्फोटात किमान नऊ जण ठार झाले आहेत.

श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
J&K Nowgam Police Station Blast: शुक्रवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील एका पोलिस ठाण्यात जप्त केलेल्या स्फोटकांचा मोठा साठा स्फोट होऊन नऊ जण ठार झाले आणि २९ जण जखमी झाले. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवार रात्री उशिरा सुमारे ११:२० वाजता श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये मोठा स्फोट झाला. मृतांमध्ये आणि जखमींमध्ये बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत असून, जखमींवर ९२ आर्मी बेस आणि एसकेआयएमएस सौरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
हा स्फोट त्या वेळी झाला जेव्हा पोलीस आणि फॉरेन्सिक टीम फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात जप्त केलेल्या स्फोटक साहित्याचे नमुने घेत होते. महत्त्वाचे म्हणजे, ही स्फोटके हरियाणातील फरीदाबादमधून अटक केलेल्या डॉ. मुजम्मिल गनई याच्या भाड्याच्या घरातून हस्तगत करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या स्फोटकांमध्ये मोठा स्फोट होण्यासाठी डेटोनेटर किंवा अन्य ट्रिगरचा वापर करणे आवश्यक आहे, त्यामुळे हा केवळ अपघात नसून तो एक दहशतवादी हल्ला असू शकतो, या दृष्टीनेही तपास केला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नौगाम पोलीस स्टेशनमध्ये ३६० किलो स्फोटक रसायने आणि आयईडी बनवण्याचे साहित्य, ज्यात डेटोनेटर, तार आणि इतर घटक होते ते ठेवण्यात आले होते. फॉरेन्सिक टीमचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी या जप्त केलेल्या स्फोटक साहित्याचे नमुने घेत असतानाच हा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे पोलीस स्टेशनच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.
स्फोटाच्या घटनेनंतर तत्काळ सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. स्फोटानंतर छोटे-छोटे स्फोट सतत होत असल्याने बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाच्या बचाव कार्यात वेळ झाला. स्फोटाच्या घटनेला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या पीपल्स अँटी-फॅसिस्ट फ्रंट या गटाने जबाबदारी घेतल्याचा दावा केला आहे, मात्र याची अधिकृत पुष्टी होणे अद्याप बाकी आहे. तपासात दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीनेही तपास केला जात आहे.
जप्त केलेल्या स्फोटकांचे कनेक्शन
हा संपूर्ण तपास १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील कारमध्ये झालेल्या स्फोटातून सुरू झाला होता, ज्यात १३ लोकांचा मृत्यू झाला होता. दिल्ली स्फोटाचे धागेदोरे नौगाममधील एका धमकी देणाऱ्या पोस्टर प्रकरणाशी जोडले गेले होते, ज्याचा तपास करताना या आंतरराज्यीय दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला.