काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे जवान व दगडफेक करणा-यांमध्ये धुमश्चक्री, लहान मुलीसह तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 17:36 IST2018-07-07T17:34:43+5:302018-07-07T17:36:09+5:30
16 वर्षांच्या लहान मुलीचाही समावेश असून 13 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे जवान व दगडफेक करणा-यांमध्ये धुमश्चक्री, लहान मुलीसह तिघांचा मृत्यू
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी परिसरात भारतीय सैन्यावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलाने जमावावर केलेल्या गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका 16 वर्षांच्या लहान मुलीचाही समावेश असून 13 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शाकीर अहमद (वय 22), इर्शाद अहमद (वय 20) आणि अंदलीब (वय 16) अशी या मृत व्यक्तींची नावे आहेत. या घटनेनंतर कुलगाम, अनंतनाग, शोपियान आणि पुलवामामधील इंटरनेट सेवा खंडित आली आहे. कुख्यात दहशतवादी बुऱ्हाण वाणी याच्या मृत्यूला दोन वर्षं पूर्ण झाल्यानिमित्तानं फुटीरतावाद्यांनी रविवारी काश्मीर बंदचं आवाहन केलं होतं. त्यामुळेच भारतीय सैन्याने पुलवामा आणि त्रालसहित अनेक भागांमध्ये कर्फ्यू जारी केला. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी अमरनाथ यात्राही काही काळ रोखण्यात आली. तसेच दहशतवादी हल्ल्यांना रोखण्यासाठी श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या आसपास 300 किलोमीटरपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.