मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 18:16 IST2024-10-22T18:15:03+5:302024-10-22T18:16:17+5:30
एका ड्रायव्हरने चक्क रुग्णांवर उपचार केल्याचं समोर आलं आहे. ड्रायव्हर इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना औषधं आणि इंजेक्शनही द्यायचा.

मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
राजस्थानमधील जयपूरमध्ये जयपूरिया रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका ड्रायव्हरने चक्क रुग्णांवर उपचार केल्याचं समोर आलं आहे. ड्रायव्हर इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना औषधं आणि इंजेक्शनही द्यायचा. ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
लोकांनी गंभीर आरोप केला आहे की, डॉक्टर नसताना ड्रायव्हर रुग्णाचं ड्रिप बदलण्यापासून औषधांपर्यंतचे सर्व सल्ले देत असतो. त्यामुळे रुग्णालयातील नर्सिंग स्टाफही त्रस्त आहे. मात्र रुग्णालय अधीक्षकांचा हा ड्रायव्हर असल्याने सर्वांनी मौन बाळगलं, मात्र आता काही कर्मचाऱ्यांनी त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
नाहर सिंह असं रुग्णांना इंजेक्शन देणाऱ्या ड्रायव्हरचं नाव आहे. नाहर हा जयपूरिया रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेश मंगल यांचा ड्रायव्हर असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत डॉ. महेश मंगल यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफशिवाय कोणालाही उपचारासाठी परवानगी नाही असंही म्हटलं.
याप्रकरणी स्पष्टीकरण देताना अधीक्षक म्हणाले की, सुदैवाने कोणत्याही रुग्णाची प्रकृती बिघडली नाही, अन्यथा प्रकरण गंभीर झाले असते. यापूर्वी कोणत्याही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबत तक्रार केली नव्हती. मात्र आता तक्रारीनंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. अहवाल येताच कारवाई केली जाईल.