Jaipur IAS Officer Slap : राजस्थानमध्ये निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला बसमध्ये कंडक्टरने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशांनी मध्यस्थी करून निवृत्त आयएएसला वाचवल्याने हा प्रकार थांबला. १० रुपये भाडे आणि योग्य बसस्थानकावर न उतरल्याने हा वाद झाला. वृद्ध सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यावर बसमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता मारहाण करणाऱ्या कंडक्टरवर कारवाई करण्यात आली आहे.
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये बसमध्ये निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे. एका वृद्ध सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यावर बसमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बसच्या भाड्यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. यानंतर जेसीटीएसएलने या प्रकरणाची दखल घेत मारहाण करणाऱ्या कंडक्टरला निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. निवृत्त आयएएस अधिकाऱ्याने कंडक्टरला कानाखाली मारल्यानंतर वादाला सुरुवात केली. त्यानंतर कंडक्टरनेही त्याला लाथ मारून धक्का मारला आणि बसमधून खाली उतरवले.
व्हिडिओमध्ये एक वयोवृद्ध प्रवासी आणि बस कंडक्टर यांच्यात भांडण होत आहे. वाद सुरू असताना कंडक्टरने वृद्धाच्या खांद्याला धक्का मारला. यामुळे वृद्ध निवृत्त आयएएस अधिकाऱ्याने संतापून कंडक्टरला कानाखाली मारली. यानंतर कंडक्टरनेही वृद्धाला पकडून ओढले आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वृद्ध निवृत्त आयएएस अधिकारी देखील कंडक्टरला लाथ मारताना दिसले. या वेळी इतर प्रवाशांनी उठून दोघांमधील भांडण शांत करण्याचा प्रयत्न केला. कंडक्टरने ज्या वृद्ध प्रवाशाला मारहाण केली ते निवृत्त आयएएस आरएल मीना असल्याची माहिती समोर आली आहे.
बस कंडक्टर घनश्याम आणि निवृत्त आयएएस आरएल मीना यांच्यात शुक्रवारी भांडण झाले. आयएएस मीना जयपूरहून कनोटाकडे जात होते. त्यांनी कानोट्याचे तिकीट काढले. बस कानोटा पार करून नाइलाजवळ पोहोचल्यावर मीना बसमधून खाली उतरू लागले. यावेळी कंडक्टर घनश्याम याने १० रुपये अधिक भाडे मागितले. त्यावर मीणा यांनी तिकीट काढलेल्या बसस्थानकावर का सोडले नाही, असा सवाल केला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होतो. त्यानंतर हाणामारीही झाली.
बस हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजस्थान पोलिसांनी त्याची दखल घेतली आणि कनोटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सेवानिवृत्त मीणा यांना झालेल्या मारहाणीची तक्रार मिळाल्यानंतर जेसीटीएसएलनेही दखल घेतली. रविवारी जयपूर सिटी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने कारवाई करत कंडक्टर घनश्याम शर्मा याला बसमधील ज्येष्ठ नागरिकाला मारहाण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित केले.