मृत्यूची ‘ती’ ४० मिनिटं...आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; आकाशातून कोसळलं ‘वीज’संकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 19:50 IST2021-07-12T19:50:28+5:302021-07-12T19:50:44+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, ऐतिहासिक आमेर किल्ल्याच्या समोर असलेल्या ५०० मीटर उंचीवरील आमेर वॉच टॉवरवर जवळपास ४० लोक एकत्रित आले होते.

मृत्यूची ‘ती’ ४० मिनिटं...आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; आकाशातून कोसळलं ‘वीज’संकट
जयपूर – गेल्या काही दिवसांपासून देशभरात अनेक राज्यात पाऊस कोसळत आहे. यातच विजांचा कडकडाटही होत आहे. आकाशातून जमिनीवर कोसळणाऱ्या या संकटामुळे जयपूरमध्ये कहर माजला आहे. आमेर वॉच टॉवर येथे आकाशातून वीज कोसळल्याने आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर अनेक जण जखमी झालेत. सध्या याठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐतिहासिक आमेर किल्ल्याच्या समोर असलेल्या ५०० मीटर उंचीवरील आमेर वॉच टॉवरवर जवळपास ४० लोक एकत्रित आले होते. पर्यटनस्थळ असल्याने अनेक जण सेल्फी घेत होते. प्रत्येक जणांचे चेहरे आनंदीत होते. पण पुढे येणाऱ्या संकटाबाबत सगळेच अनभिज्ञ होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मी माझ्या मित्रांसोबत त्याठिकाणी गेलो होतो. आम्ही सेल्फी घेत नव्हतो परंतु इतर सगळे सेल्फी घेत होते. ४० मिनिटांच्या कालावधीत अनेकदा वीज कोसळली.
लोक ज्याठिकाणी उभे होते तिथेच खाली पडले. आमेरमध्ये आलेल्या संकटात सापडलेल्या पीडित इजहार अलीने सांगितले की, जेव्हा वीज कोसळली तेव्हा मी वॉच टॉवरवरच होतो. मी खाली पडलो पण २० मिनिटानंतर पुन्हा मला शुद्ध आली. त्यानंतर काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. राजस्थान सरकारने सांगितले की, आम्ही कोणत्याही संकटाला तोंड द्यायला तयार आहोत. जे मृत झालेत त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने ४ लाखांची मदत करण्यात येणार आहे. SDRF आणि राज्य पोलिसांची ५ टीम रविवारी रात्री सर्च ऑपरेशन करत आहेत. आतापर्यंत ११ लोकांचे मृतदेह सापडले आहेत. तर १५ जखमी आहेत. राज्यात आतापर्यंत वीज कोसळल्यानंतर २० लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी राजस्थान सरकारने दिली आहे.