'जय हिंद, कोड पाठवा...', राष्ट्रपतींचं बनावट फेसबुक अकाउंट तयार करून फसवणुकीचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 10:07 IST2024-12-17T10:04:50+5:302024-12-17T10:07:00+5:30
सायबर गुन्हेगारांनी फेसबुकवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावाचा वापर करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

'जय हिंद, कोड पाठवा...', राष्ट्रपतींचं बनावट फेसबुक अकाउंट तयार करून फसवणुकीचा प्रयत्न
सध्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. फसवणूक करुन खात्यावरील पैसे काढल्याची अनेक प्रकरण समोर आली आहे. सोशल मीडियावर लोकांची बनावट खाते काढून फसवणूक केल्याची प्रकरणे समोर आली आहे. सेलिब्रेटी आणि उच्च पदांवर असलेले अधिकारी, राजकारणी नेते यांच्याशिवाय इतर लोकांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते काढून घोटाळे केले जात आहेत. आताही असंच एक प्रकरण समोर आले आहे. गुन्हेगारांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावाने बनावट खाते तयार केल्याचे समोर आले आहे.
काही दिवसापूर्वी, हजारीबाग, झारखंड येथील रहिवासी असलेल्या मंटू सोनी या फेसबुक वापरकर्त्याला अशाच एका खात्यातून फ्रेंड रिक्वेस्टची नोटीफिकेशन मिळाली. या प्रोफाइलचे वापरकर्ता नाव, प्रोफाइल फोटो आणि तपशील राष्ट्रपतींचे होते.
त्या तरुणाला 'राष्ट्रपतींच्या नावाने एका अकाउंटवरून मेसेज आला, "जय हिंद, कसे आहात?" यानंतर घोटाळेबाज म्हणाला, मी फेसबुक क्वचितच वापरतो, मला तुझा व्हॉट्सॲप नंबर द्या. मंटूने त्याचा नंबर दिला. काही तासांनंतर, फेसबुक मेसेंजरवर एक संदेश आला की, "आम्ही तुमचा नंबर सेव्ह केला आहे आणि तुम्हाला तुमचा व्हॉट्सॲप कोड पाठवला आहे, जो तुमच्या व्हॉट्सॲपवर जाईल. कृपया आम्हाला कोड पटकन पाठवा, तो ६ अंकी क्रमांक आहे.
यानंतर त्या व्यक्तीला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. मंटूने राष्ट्रपती भवन, झारखंड पोलीस आणि इतरांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर टॅगिंगवर या घटनेची माहिती शेअर केली.
महामहीम @rashtrapatibhvn जी आपके नाम और फोटो से बने फेसबुक प्रोफ़ाइल से साइबर ठगी का खेल चलाया जा रहा है. @JharkhandPolice@ranchipolice@DelhiPolice@Cyberdost कृप्या ध्यान दें. pic.twitter.com/VLc5K18rh7
— mantu soni (@KantShani75443) December 15, 2024
रांची पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आणि फेसबुक पोस्टचे सर्व तपशील मागवले.
या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. रांचीचे एसएसपी चंदन सिन्हा यांनी माध्यमांना सांगितले की, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आम्ही एजन्सींना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.