राजस्थानमधील चुरू येथील हवाई दलाच्या जग्वार लढाऊ विमान अपघातात दोन तरुण पायलटचा मृत्यू झाला. ३१ वर्षीय स्क्वॉड्रन लीडर लोकेंद्र सिंह सिंधू आणि २३ वर्षीय फ्लाइट लेफ्टनंट ऋषी राज सिंह देवरा यांनी आपला जीव गमावला. सिंधू हरियाणातील रोहतक येथील रहिवासी होते, तर देवरा राजस्थानमधील पाली येथील रहिवासी होते.
लोकेंद्र सिंह सिंधू यांचं मूळ गाव रोहतकमधील खेडी होतं. हे कुटुंब रोहतक शहरातील देव कॉलनीमध्ये राहतं. लोकेंद्र यांच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. गावात शोककळा पसरली आहे. लोकेंद्र यांच्यामागे त्यांच्या पत्नी, एक महिन्याचा मुलगा आणि पालक आहेत.
ऋषी राज सिंह देवरा यांना आज त्यांच्या पाली जिल्ह्यातील मूळ गावी अंतिम निरोप देण्यात येईल. ऋषी यांचं अद्याप लग्न झालेलं नव्हतं. कुटुंब लेकाच्या लग्नाची खूप वाट पाहत होतं. ते मुलाच्या लग्नासाठी चांगली मुलगी शोधत होते.
जॅग्वार विमान बुधवारी (९ जुलै) राजस्थानमधील चुरू येथील भानुदा गावाजवळ नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान कोसळलं. त्यात दोन्ही पायलटचा मृत्यू झाला. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं हवाई दलाने सांगितलं.
स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १:२५ वाजता भानुदा गावातील एका शेतात अचानक हे विमान कोसळलं. अपघातानंतर मोठा आवाज ऐकू आला. आगीच्या ज्वाळा उठल्या आणि सर्वत्र धूर पाहायला मिळाला. त्यानंतर स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.