हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 18:02 IST2025-12-17T18:02:13+5:302025-12-17T18:02:55+5:30
लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या एका जोडप्याला नर्मदा नदीच्या काठावर फोटो काढणं महागात पडलं आहे.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका जीवघेण्या सेल्फीने पुन्हा एकदा एका कुटुंबाचा आनंद हिरावून घेतला. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या एका जोडप्याला नर्मदा नदीच्या काठावर फोटो काढणं महागात पडलं आहे. फोटो काढत असताना पत्नीचा पाय घसरला आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहात ती वाहून गेली. २४ तासांनंतर तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
या दुर्घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ३६ वर्षीय स्वाती तिचा पती आशिष गर्ग आणि १० वर्षांच्या मुलीसोबत बाहेर गेली होती आहे. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑर्डनन्स फॅक्टरीत ज्युनियर वर्क्स मॅनेजर असलेले आशिष गर्ग हे त्यांची पत्नी स्वाती, आई-बाबा आणि १० वर्षांच्या मुलीसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर गेले होते. त्यांनी आधी त्रिपुरा सुंदरी मंदिराचे दर्शन घेतलं आणि नंतर भेडाघाट परिसरात गेले.
संध्याकाळ झाली होती आणि कुटुंब नर्मदा धबधब्याजवळ फोटो काढण्यात व्यस्त होते. स्वाती देखील एका खडकाजवळ सेल्फी काढत होती. अचानक तिचा पाय घसरला आणि काही सेकंदातच ती नर्मदेच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. कोणालाही तिला वाचवता आलं नाही. पती आणि मुलीच्या डोळ्यादेखत तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. २४ तासांच्या शोध मोहिमेनंतर, स्वातीचा मृतदेह सापडला.
आशिषच्या वडिलांनी सांगितलं की संपूर्ण कुटुंब आनंदी होतं आणि हा आनंद असा दुर्घटनेत बदलेल याची कोणीही कल्पना केली नव्हती. पोलिसांनी ता पर्यटन क्षेत्रात लोकांना सतर्क केलं आहे. लोक सोशल मीडियावर फोटो आणि लाईक्स मिळवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात असंही म्हटलं. पर्यटकांनीही सावधगिरी बाळगली पाहिजे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.