Gautam Adani : देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने भाजपसाठी काम केल्याचा आरोप केला जातो. पण, आता स्वतः गौतम अदानी यांनी गुरुवारी(दि.26) हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मीडियाशी बोलताना त्यांनी व्यवसायातील मक्तेदारीपासून ते भाजपशासित राज्यांमध्ये काम करण्यापर्यंतच्या मुद्द्यांवर खुलेपणाने आपले मत मांडले.
एएनआय या वृत्तसंस्थेने गौतम अदानी यांच्याशी झालेल्या संभाषणातील काही भाग शेअर केला आहे. गौतम अदानी म्हणाले की, 'अदानी समूह देशातील 25 राज्यांमध्ये काम करतो. आम्ही काँग्रेस किंवा भाजपसोबत नाही, तर प्रत्येक सरकारसोबत काम करत आहोत. जोपर्यंत राजकारण होत नाही, तोपर्यंत आम्हाला कोणत्याही सरकारसोबत काम करण्यास हरकत नाही,' अशी प्रतिक्रिया अदानी यांनी दिली.
गौतम अदानी पुढे म्हणतात, 'आमचा समूह पायाभूत सुविधा क्षेत्रात काम करतो. या क्षेत्रात आमच्यापेक्षा मोठ्या कंपन्या आहेत, पण त्या या क्षेत्रात 25 टक्केही काम करत नाहीत. आम्ही करत आहोत. त्या कंपन्या उद्योगाच्या आधारावर मोठ्या आहेत, पण पायाभूत सुविधांच्या आधारावर नाही. याचे कारण म्हणजे, हे क्षेत्र काम करण्यासाठी सर्वात कठीण क्षेत्रांपैकी एक आहे. 5 ते 6 वर्षे या व्यवसायात स्वत:ला वाहून घेतल्याशिवाय हा व्यवसाय करता येत नाही. कधीही प्रकल्प बंद पाडण्याचा धोका असतो. शिवाय, तुम्हाला 10 वर्षांनंतरच परतावा मिळतो, त्यामुळे इतका धीर कोणाकडे नाही.'
'आज आम्ही 25 राज्यांमध्ये काम करत आहोत. लोक अनेकदा म्हणतात की, अदानी ग्रुप भाजपच्या राज्यात काम करतो, पण आम्ही केरळमध्येही काम करतो. विंझीगम बंदर हा 20,000 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. तो प्रकल्प काँग्रेस सरकारने दिला. त्यामुळे आम्ही फक्त भाजपसोबत काम करतो असे नाही. आम्ही प्रत्येक सरकारसोबत काम करण्यास तयार आहोत. जोपर्यंत राजकारण होत नाही, तोपर्यंत आम्हाला कोणाचीही अडचण नाही. पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रकल्प सरकारच्या पाठिंब्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सरकारच्या मदतीनेच हे शक्य आहे,' असेही अदानी यावेळी म्हणाले.