भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 08:50 IST2025-12-22T08:48:05+5:302025-12-22T08:50:52+5:30
संघटनेच्या विकासाने काही लोकांच्या हितावर परिणाम होऊ शकतो, ज्यातून विरोध होत असेल. परंतु संघ कुणालाही शत्रू मानत नाही असं मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.

भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
कोलकाता - जर तुम्हाला संघाला समजून घ्यायचे असेल तर त्याचा अनुभव घ्यावा लागेल. तुलना केल्यास दिशाभूल होईल. जर तुम्ही संघाला फक्त आणखी एक संघटना मानत असाल तर ते चुकीचे आहे. बरेच लोक संघाला भाजपाच्या नजरेने पाहत असतात. जी मोठी चूक आहे असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. कोलकाता येथील आरएसएसच्या १०० व्याख्यान मालेत ते बोलत होते.
यावेळी मोहन भागवत म्हणाले की, भाजपाचे अनेक नेते आरएसएसशी जोडलेले आहेत परंतु दोन्हीही वेगवेगळी भूमिका आणि वेगळ्या संघटना आहेत. आरएसएस कधी राजकारण करत नाही आणि त्यांचा कुणी शत्रू नाही. ही संघटना पूर्णत: हिंदू समाजाच्या भल्यासाठी, सुरक्षेसाठी आणि एकतेसाठी काम करत असते. संघाला नेहमी चुकीचे ठरवले जाते. खूप जणांना संघाचे नाव माहिती आहे परंतु त्यांचे काम समजत नाही. आरएसएस कधी द्वेषभावनेने आणि संघर्षाच्या मानसिकतेतून काम करत नाही. आरएसएसचा मुख्य उद्देश 'सज्जन' म्हणजेच नैतिकदृष्ट्या सरळ आणि सद्गुणी व्यक्ती निर्माण करणे आहे जे सेवा, मूल्ये आणि राष्ट्रीय अभिमानाने प्रेरित आहेत आणि देशाच्या विकासात योगदान देतील असं त्यांनी सांगितले.
तसेच संघटनेच्या विकासाने काही लोकांच्या हितावर परिणाम होऊ शकतो, ज्यातून विरोध होत असेल. परंतु संघ कुणालाही शत्रू मानत नाही. आरएसएस मुस्लिमविरोधी आहे अशा धारणा तथ्यांपेक्षा कथांवर आधारित आहेत. संघाचे काम पारदर्शक आहे आणि कोणीही ते पाहू शकते असं सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघ मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप फेटाळला. जे लोक आले, त्यांनी आमचे काम पाहिले. त्यांनी हाच निष्कर्ष काढला की आम्ही कट्टर राष्ट्रवादी आहोत जे हिंदूंच्या सुरक्षेसाठी काम करतो परंतु मुस्लीम विरोधी नाही. टीकाकारांनी संघटनेचा दौरा करून हे समजून घेतले पाहिजे. भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनणार आहे आणि समाजाला त्या भूमिकेसाठी तयार करणे हे संघाचे काम असंही मोहन भागवत यांनी म्हटलं.
दरम्यान, संघाच्या शताब्दी सोहळ्याचा भाग म्हणून आरएसएसचे सत्य जनतेसमोर ठेवण्यासाठी कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये व्याख्यान आणि संवादाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल. लोकांनीही इतर स्त्रोतांऐवजी तथ्यावर आधारित मत बनवण्याचा आग्रह भागवत यांनी केला.