"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:36 IST2025-12-19T15:35:47+5:302025-12-19T15:36:14+5:30
हिजाबवर बंदी घातली जाणार...?

"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
पाटणा : सध्या बिहारमध्ये हिजाबच्या मुद्द्यावरून जबरदस्त राजकारण पेटले आहे. या वादात आता भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भूमिकेचे उघडपणे समर्थन केले आहे. सार्वजनिक ठिकाणे, सरकारी नोकऱ्या आणि मतदान केंद्रांवर हिजाब परिधान करण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणीच बिहार भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
इस्लाममध्ये कोठेही चेहरा पूर्णपणे झाकण्याचा उल्लेख नाही -
भाजपचे मीडिया प्रभारी दानिश इक्बाल यांनी यासंदर्भात थेट भाष्य केले आहे. ते म्हणाले, "काळे कपडे परिधान करून संपूर्ण चेहरा झाका, असे कुरानमध्ये कुठेही लिहिलेले नाही. इस्लाममध्ये कोठेही चेहरा पूर्णपणे झाकण्याचा उल्लेख नाही. इस्लाममध्ये शालीनतेने पडदा पाळण्यास सांगितले आहे." तसेच, विरोधी पक्ष मुस्लीम महिलांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवून चार भिंतीतच कैद करू इच्छितो, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
नीतीश कुमार खऱ्या अर्थाने महिलांचे हितैशी -
नीतीश कुमार यांनी एका कार्यक्रमादरम्यान एका महिलेचा हिजाब आपल्या हाताने बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेवर भाष्य करताना भाष्य करताना इक्बाल म्हणाले, मुख्यमंत्री हे महिलांचे खऱ्या अर्थाने हितैषी आहेत. त्यांच्या कार्यामुळेच आज मुस्लीम समाजातील मुली डॉक्टर होऊन नियुक्ती पत्रे स्वीकारत आहेत. संबंधित महिलेने नोकरीसाठी कोलकाता येथे जाण्याची गरज नसून बिहारमध्येच राहून सेवा करावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
दानिश इक्बाल यांच्या या विेधानाने बिहारमधील राजकारणात पुन्हा एकदा हिंदुत्व आणि महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावरून चर्चा होताना दिसत आहे.