आयटी इंजिनिअर नोकरी गमावली, होम लोनचा हप्ता भरण्यासाठी थेट रॅपिडो ड्रायव्हर बनला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:33 IST2025-11-25T15:32:43+5:302025-11-25T15:33:13+5:30
गृह कर्जाचे हप्ते घरखर्च भागवण्यासाठी हा इंजिनिअर आता रॅपिडो ड्रायव्हर म्हणून पार्ट-टाईम काम करत आहे.

आयटी इंजिनिअर नोकरी गमावली, होम लोनचा हप्ता भरण्यासाठी थेट रॅपिडो ड्रायव्हर बनला!
एका चांगल्या संधीच्या शोधात आपल्या जुन्या नोकरीचा राजीनामा देणे एका आयटी इंजिनिअरला महागात पडले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो बेरोजगार असून, सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याच्यावर असलेल्या गृह कर्जाचे हप्ते. हे हप्ते आणि घरखर्च भागवण्यासाठी हा इंजिनिअर आता रॅपिडो ड्रायव्हर म्हणून पार्ट-टाईम काम करत आहे. 'नोमॅडिक तेजु' नावाच्या एका युजरने इन्स्टाग्रामवर आपल्या या मित्राची संघर्षमय कहाणी एका पोस्टद्वारे शेअर केली असून, ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
गौर सिटीतील फ्लॅट गेला, भाड्याच्या घरात शिफ्ट
इन्स्टाग्रामवर 'नोमॅडिक तेजु' यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या इंजिनिअर मित्राची हलाखीची परिस्थिती समोर आली आहे. हा मित्र ग्रेटर नोएडाच्या गौर सिटी परिसरात राहत होता. आयटी इंजिनिअर असल्याने त्याने या आलिशान सोसायटीमध्ये कर्जावर फ्लॅट घेतला होता. परंतु, नोकरी गमावल्यानंतर त्याला होम लोनचे हप्ते भरणे कठीण झाले. त्यामुळे त्याने नाइलाजाने तो फ्लॅट भाड्याने दिला. आता तो स्वतः कुटुंबासह एका स्वस्त भाड्याच्या घरात राहायला गेला आहे, जेणेकरून खर्चात कपात करता येईल.
होम लोनची EMI भरण्यासाठी 'रॅपिडो'चा आधार
तेजू सांगतात, "माझा मित्र गेले दोन महिने बेरोजगार आहे. होम लोनचा हप्ता देण्यासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो गेल्या दोन महिन्यांपासून पार्ट-टाईम रॅपिडो बाईक चालवत आहे." रॅपिडो ड्रायव्हिंगसोबतच तो फ्रीलान्सिंगचे काही काम करूनही पैसे कमवण्याचा प्रयत्न करत आहे.
सोशल मीडियावर चर्चा
या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयटी क्षेत्रातील सध्याची अस्थिरता आणि बेरोजगारीची समस्या यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिले की, "ही तर फक्त सुरुवात आहे. आयटी क्षेत्रात आधीच मोठ्या संख्येने लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत आणि भविष्यात ही संख्या आणखी वाढेल." दुसऱ्या एका युजरने "भारतात परिस्थिती अधिक कठीण होणार आहे. जर परदेशात जाण्याची संधी मिळत असेल, तर त्वरित जा," असा सल्ला दिला.
तिसऱ्या एका वापरकर्त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात येत असल्याचे मत व्यक्त केले. "एआयमुळे परिस्थिती आणखी बिकट होईल. लोकांनी कमी खर्चात कसा करायचा हे शिकले पाहिजे आणि मोठ्या वस्तूंची खरेदी टाळली पाहिजे," असे त्यांनी सुचवले.