ISRO: आता अंतराळातही फोन कनेक्ट होणार, इस्रोचं ऐतिहासिक पाऊल, नवीन उपग्रह प्रक्षेपित करणाच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:05 IST2025-08-11T13:04:26+5:302025-08-11T13:05:45+5:30

Block-2 BlueBird satellite: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे.

ISRO to launch US-made Block-2 BlueBird satellite in September aboard LMV-3 | ISRO: आता अंतराळातही फोन कनेक्ट होणार, इस्रोचं ऐतिहासिक पाऊल, नवीन उपग्रह प्रक्षेपित करणाच्या तयारीत

ISRO: आता अंतराळातही फोन कनेक्ट होणार, इस्रोचं ऐतिहासिक पाऊल, नवीन उपग्रह प्रक्षेपित करणाच्या तयारीत

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. इस्रोने अलीकडेच जगातील सर्वात महागडा उपग्रह NISAR यशस्वीरित्या लॉन्च केला असून, तो लवकरच अंतराळात सोडण्यात येणार आहे. या उपग्रहाच्या साहाय्याने मोबाईलमध्ये अंतराळ कनेक्टिव्हिटी मिळवणे शक्य होणार आहे. इस्रो लवकरच अमेरिकेचा ६,५०० किलो वजनाचा ब्लॉक-२ ब्लूबर्ड उपग्रह देखील प्रक्षेपित करणार आहे. हा उपग्रह पुढील महिन्यात भारतात येणार असून, आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित केला जाईल. इस्रोचे शक्तिशाली एलव्हीएम-३- एम५ हे रॉकेट या उपग्रहाला अंतराळात नेणार आहे.

ब्लॉक-२ ब्लूबर्ड हा एक प्रगत अमेरिकन उपग्रह आहे, जो थेट मोबाइल फोन डेटा आणि कॉल कनेक्टिव्हिटीसाठी तयार करण्यात आला आहे. या उपग्रहाद्वारे जमिनीवर किंवा हवेत, अगदी दुर्गम भागातसुद्धा थेट कनेक्टिव्हिटी मिळू शकते. अहवालानुसार, या उपग्रहामध्ये ६४.३८ चौरस मीटरचा कम्युनिकेशन अ‍ॅरे आहे, जो थेट मोबाइल फोनशी जोडता येतो. हा उपग्रह 3GPP मानक फ्रिक्वेन्सीवर कार्य करतो, म्हणजेच तो 3G, 4G आणि 5G सारख्या सध्या वापरल्या जाणाऱ्या मोबाईल नेटवर्क तंत्रज्ञानासोबत सुसंगत आहे.

या उपग्रहाची खासियत म्हणजे तो थेट उपग्रहातून स्मार्टफोनवर ब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्रदान करतो, त्यासाठी कोणत्याही बेस टर्मिनलची आवश्यकता नसते. उपग्रहातील कम्युनिकेशन अ‍ॅरेद्वारे वापरकर्ते सुमारे १२ एमबीपीएस वेगाने डेटा अ‍ॅक्सेस करू शकतात. यामुळे जगभरातील टेलिकॉम कंपन्यांना एकत्रितपणे व्हॉइस कॉल, डेटा सेवा आणि व्हिडिओ कॉलिंगसारख्या सुविधा सहजपणे पुरवता येणार आहेत.

भारतामध्ये उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा सुरू करण्याची तयारी वेगाने सुरू आहे. एलोन मस्क यांची स्टारलिंक, तसेच जिओ आणि एअरटेल या कंपन्यांना देशात उपग्रह ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. लवकरच दूरसंचार विभाग स्पेक्ट्रमच्या वाटपाला परवानगी देणार असून, त्यानंतर या सेवा अधिकृतपणे सुरू होतील.

स्टारलिंक आणि इतर उपग्रह इंटरनेट सेवा प्रदात्यांनी अलीकडेच 'डायरेक्ट टू स्मार्टफोन' या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी पूर्ण केली. या तंत्रज्ञानामुळे, वापरकर्त्याचा स्मार्टफोन थेट उपग्रहाशी जोडला जाऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे, आपत्कालीन परिस्थितीत, जसे की नैसर्गिक आपत्ती किंवा नेटवर्क खंडित झाल्यास, ही सेवा अतिशय उपयुक्त ठरू शकते.

Web Title: ISRO to launch US-made Block-2 BlueBird satellite in September aboard LMV-3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.