अवकाशातून ८८८ किमीवरून कोसळले... कशामुळे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 11:07 IST2025-05-25T11:02:29+5:302025-05-25T11:07:02+5:30
याबाबत इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि अयशस्वी मोहिमेची माहिती दिली.

अवकाशातून ८८८ किमीवरून कोसळले... कशामुळे?
लीना बोकील, नासा स्पेस एज्युकेटर, विज्ञान प्रसारक (शास्त्र संवादक)
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) सर्वाधिक विश्वासार्ह प्रक्षेपण प्रणालींपैकी एक असलेल्या ‘पीएसएलव्ही-सी६१’ मोहिमेचे प्रक्षेपण १८ मे रोजी अयशस्वी ठरले. ही मोहीम ईओएस-०९ (रिसॅट-१बी) उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यासाठी होती. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे उपग्रह नियोजित कक्षेत पोहोचू शकला नाही आणि मोहीम अपूर्ण राहिली. इस्रोची १०१ वी मोहीम असून, मागील ८ वर्षांमध्ये इस्रोने केलेल्या पीएसएलव्ही मोहिमांमध्ये पहिल्यांदा अपयश आले आहे. याबाबत इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि अयशस्वी मोहिमेची माहिती दिली.
ते म्हणाले की, ‘पीएसएलव्ही-सी६१’चे चार टप्पे होते. त्यातील दोन टप्पे अपेक्षेप्रमाणे पार पडले. तिसऱ्या टप्प्यातील नेमकी काय विसंगती होती, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली नसली, तरी पुढील विश्लेषणानंतर पुन्हा प्रक्षेपणाचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. खरे तर ही मोहीम सीमा सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, शेती क्षेत्रातील निरीक्षण, पायाभूत सुविधा निरीक्षण आणि कोणत्याही हवामानातील प्रतिमांकन यासाठी महत्त्वाची होती. ‘पीएसएलव्ही-सी६१’ रॉकेटच्या माध्यमातून ईओएस-०९ (रिसॅट-१बी) या अत्याधुनिक उपग्रहामार्फत रडार इमेजिंग केले जाणार होते. मागील अनेक वर्षांपासून पीएसएलव्ही उपग्रहांच्या मोहिमा यशस्वी झाल्या असून क्वचितच यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे अपयश आले आहे. त्यामुळे या अपयशातून इस्रोद्वारे नवीन सुधारणा करत अत्याधुनिक बाबींची पूर्तता केली जाईल यात काही शंका नाही.
का मिळाले असू शकते अपयश?
प्रक्षेपणाच्या सुरुवातीच्या दोन टप्प्यांमध्ये सर्व काही सुरळीत होते. मात्र, तिसऱ्या टप्प्यात, रॉकेटच्या सॉलिड मोटरमध्ये चेंबर प्रेशरमध्ये अचानक घट झाली, ज्यामुळे उपग्रह नियोजित कक्षेत पोहोचू शकला नाही. ही समस्या सुमारे ६ मिनिटांनंतर, रॉकेट ८८८ किमी अंतरावर असताना उद्भवली. या अपयशामुळे उपग्रह भारतीय महासागरात कोसळला. नोझल किंवा इंधन वितरण प्रणालीतील दोष अथवा इलेक्ट्रॉनिक किंवा सेंसर प्रणालीतील बिघाड अशी याची काही संभाव्य कारणे देखील असू शकतात.
इस्रोने अपयशानंतर 'फेल्युअर ॲनालिसिस कमिटी' स्थापन केली आहे, जी या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करणार आहे. इस्रोचे पीएसएलव्ही-सी६१ प्रक्षेपण अपयशी झाले असले तरी, ही इस्रोसाठी केवळ एक तांत्रिक अडचण आहे, पराभव नाही. भारतीय अंतराळ संस्था नेहमीच अशा अपयशातून शिकून नवी उंची गाठत आहे. भविष्यातील ईओएस-०९ सारख्या प्रगत उपग्रह प्रकल्पांसाठी ही घटना एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
ईओएस-०९ हा सी-बँड सिंथेटिक अपर्चर रडार (सीएआर) प्रणालीसह सुसज्ज उपग्रह होता, जो कोणत्याही हवामानात, दिवसा किंवा रात्री, पृथ्वीच्या पृष्ठभागाचे उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा घेऊ शकतो. या उपग्रहाचा उपयोग सीमा सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, शेती निरीक्षण आणि पायाभूत सुविधा मॉनिटरिंगसाठी होणार होता.
भविष्यात काय सुधारणा करावी?
तांत्रिक प्रणालींचे पुनरावलोकन : तिसऱ्या टप्प्यातील सॉलिड मोटर आणि संबंधित प्रणालींचे पुनरावलोकन करून आवश्यक सुधारणा केल्या जातील.
गुणवत्ता नियंत्रण : प्रत्येक घटकाची गुणवत्ता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी कठोर चाचण्या आणि मानके लागू केली जातील.
डेटा विश्लेषण : प्रक्षेपणाच्या सर्व टप्प्यांतील डेटा सखोलपणे विश्लेषण करून भविष्यातील संभाव्य त्रुटी ओळखल्या जातील.
मोहीम यशस्वी झाली असती तर सीमेवर असती बारीक नजर
याआधी पाठविण्यात आलेल्या ईओएस पृथ्वी निरीक्षण उपग्रहाद्वारे संरक्षण विभागाला मोठी मदत झाली आहे. मात्र, ईओएस-०९ (रिसॅट-१बी) याद्वारे अत्याधुनिक उपग्रहाच्या मदतीने देशाच्या संपूर्ण सीमा सुरक्षित करण्यासाठी मोठी मदत झाली असती. मिनिट टू मिनिट संरक्षण विभागाला याद्वारे सीमांलगत सुरू असलेल्या घटना-घडामोडींची माहिती मिळाली असती.
या मोहिमेला महत्त्व का होते?
‘ईओएस-०९’ हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह होता ज्यामध्ये सिंथेटिक अपर्चर रडार (एसएआर)ने सुसज्ज आणि दिवस-रात्र सर्व हवामान परिस्थितीत उच्च-रिझॉल्यूशन प्रतिमा कॅप्चर करण्यास सक्षम होता. तसेच भारताच्या सर्व्हेक्षण आणि रिमोट सेन्सिंग क्षमतांना बळकटी देण्यासाठीदेखील महत्त्वाचा होता.
‘पीएसएलव्ही-सी६१’ अपयशी मोहिमेतील तांत्रिक अडचणी दूर करून इस्रो नवी उंची गाठेल.