इस्लामचा स्वीकार हीच खरी ‘घर वापसी’!
By Admin | Updated: January 6, 2015 02:39 IST2015-01-06T02:39:20+5:302015-01-06T02:39:20+5:30
इस्लामचा स्वीकार करणे हीच खरी ‘घर वापसी’ आहे, असे वादग्रस्त विधान करून मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले.

इस्लामचा स्वीकार हीच खरी ‘घर वापसी’!
आगीत तेल : एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींचे वादग्रस्त वक्तव्य
हैदराबाद : इस्लाम हेच सर्व धर्मांचे मूळ आहे आणि म्हणूनच अन्य धर्मांच्या लोकांनी इस्लामचा स्वीकार करणे हीच खरी ‘घर वापसी’ आहे, असे वादग्रस्त विधान करून मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी धर्मांतरावरून सध्या देशात सुरू असलेल्या वादाच्या आगीत आणखी तेल ओतले आहे.
‘ईद-ए-मिलाद’च्या पूर्वसंध्येस शनिवारी रात्री येथील ‘दारउस्सलाम’ या पक्ष मुख्यालयाबाहेर हजारो उपस्थितांना संबोधित करताना, संघ परिवाराने हाती घेतलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमाच्या संदर्भात, ओवैसी यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, प्रत्येक माणूस मुस्लिम म्हणूनच जन्माला येत असतो; पण त्याचे आई-वडील त्याचे धर्मांतर करतात. त्यामुळे असे धर्मांतर झालेले परधर्मीय जेव्हा इस्लाम ‘कुबूल’ करतील तेव्हाच खरी ‘घर वापसी’ होईल.
इतर सर्व धर्मांच्या लोकांनी इस्लामचा स्वीकार करावा, पण त्यासाठी आमची सक्ती नाही, असे सांगताना ते म्हणाले की, आम्ही (इस्लाम) तुम्हाला पैसे देऊ शकत नाही; पण इहलोकीच्या आणि परलोकीच्या सुखाची हमी मात्र नक्की देऊ शकतो.
संपूर्ण मानव वंशाचा जनक असलेला ‘आदम’ (अॅडम) (स्वर्गातून) पृथ्वीवर अवतरला तेव्हा सर्वप्रथम तो भारतात उतरला. त्यामुळे भारत ही आपली पितृभूमी आहे, असा दावाही ओवैसी यांनी केला.
संघ परिवाराच्या ‘घर वापसी’वर मूग गिळून गप्प बसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी टीका केली.
निरपराध्यांची हत्या करणारे पाकिस्तानवासी दहशतवादी झकी-उर-रहमान लख्वी आणि हफीज सईद हे भारताचे शत्रू आहेत व त्यांच्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी, असे सांगताना ओवैसी म्हणाले की, एमआयएमचे भारतीय जनता पक्षाशी राजकीय मतभेद असले तरी देशाच्या शत्रूंवर कारवाईच्या बाबतीत आमचा भाजपाला पाठिंबा आहे व ही भूमिका आपण संसदेतही स्पष्टपणे मांडली आहे. (वृत्तसंस्था)