कोळसा खाण वाटपात अनियमितता, ७ जण दोषी; दिल्लीच्या विशेष न्यायालयाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 07:18 IST2023-07-14T07:17:49+5:302023-07-14T07:18:31+5:30
विशेष न्यायाधीश संजय बंसल यांनी आरोपींना फौजदारी कट (भादंवि १२०-ब), फसवणूक (भादंवि ४२०) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरवले

कोळसा खाण वाटपात अनियमितता, ७ जण दोषी; दिल्लीच्या विशेष न्यायालयाचा निर्णय
नवी दिल्ली : दिल्लीच्या सीबीआय विशेष न्यायालयाने गुरुवारी छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपात अनियमिततेशी संबंधित प्रकरणात ७ जणांना दोषी ठरवले आहे. यात माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, देवेंद्र दर्डा, माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता आणि दोन वरिष्ठ अधिकारी के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया, यवतमाळ एनर्जी प्रा. लि. आणि त्याचे संचालक मनोजकुमार जायस्वाल यांचा समावेश आहे.
विशेष न्यायाधीश संजय बंसल यांनी आरोपींना फौजदारी कट (भादंवि १२०-ब), फसवणूक (भादंवि ४२०) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरवले. असे असले तरी न्यायालयाने भादंविच्या कलम ४०९ (लोकसेवकाकडून अपराधिक विश्वासभंग) अंतर्गत गुन्ह्यातून आरोपींना मुक्त केले. या प्रकरणात शिक्षेसंदर्भात १८ जुलै रोजी सुनावणी होईल. सीबीआयनुसार कोळसा अनियमिततेशी संबंधित प्रकरणांत ही १३ वी दोषसिद्धी आहे.