पीएम मोदींनी संसदेत सांगितलं वास्तव! आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय, पण युद्धामुळे भारतासमोर मोठी आव्हानं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 14:31 IST2026-03-23T14:30:26+5:302026-03-23T14:31:13+5:30

'सध्या भारताकडे ५.३ दशलक्ष मेट्रिक टनांहून अधिक कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे.'

Iran-Israel war poses major challenges to India: Modi's statement in Parliament | पीएम मोदींनी संसदेत सांगितलं वास्तव! आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय, पण युद्धामुळे भारतासमोर मोठी आव्हानं...

पीएम मोदींनी संसदेत सांगितलं वास्तव! आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय, पण युद्धामुळे भारतासमोर मोठी आव्हानं...

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सध्या सुरू असून, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम आशियात निर्माण झालेल्या परिस्थितीवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. लोकसभेत बोलताना पीएम मोदींनी इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील संघर्षाबाबत चिंता व्यक्त केली. तसेच, सर्व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरक्षितपणे भारतात पोहोचत राहील, याची खात्री करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.

युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम

या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने उभी राहिली आहेत. ही आव्हाने आर्थिक स्वरूपाची, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आणि ती मानवतावादी स्वरूपाचीही आहेत. कच्च्या तेलाचा आणि गॅसचा मोठा साठा मध्यपूर्वेतून येत असल्याने, या संघर्षाबाबत भारताला वाटणारी चिंता साहजिकच रास्त आहे. 

अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, कच्च्या तेलाचा, वायूचा आणि खतांचा पुरवठा 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) मार्गे भारतात होतो. या मार्गावरून जहाजांची वाहतूक करणे सध्या आव्हानात्मक बनले आहे. या पार्श्वभूमीवर, हा पुरवठा अखंडित राहील याची खात्री करण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. देशातील सामान्य नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, हा यामागील उद्देश आहे. भारताच्या देशांतर्गत एलपीजी (LPG) गरजेपैकी ६० टक्के गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. त्यामुळे, एलपीजीचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्याला सध्या प्राधान्य दिले जात आहे.

विविध देशांतील पुरवठादारांशी संपर्क

पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की, सरकार विविध देशांमधील पुरवठादारांच्या संपर्कात आहे. आज भारत ४१ वेगवेगळ्या देशांकडून ऊर्जेची आयात करतो. सध्या भारताकडे ५.३ दशलक्ष मेट्रिक टनांहून अधिक कच्च्या तेलाचा (क्रूड ऑइल) साठा उपलब्ध आहे आणि ६.५ दशलक्ष मेट्रिक टनाचा साठा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. तेल आणि वायूचा पुरवठा शक्य असलेल्या प्रत्येक स्रोताकडून अविरत सुरू राहील, हे सुनिश्चित करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. सरकार आखाती प्रदेशावर, तसेच त्या परिसरातील पर्यायी पुरवठा मार्गांवरही बारकाईने लक्ष ठेवून आहे. 

पीएम मोदींची बैठक

दरम्यान, पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. ही बैठक सुमारे ३.३० तास चालली. या बैठकीत  पेट्रोलियम, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, वीज आणि खत पुरवठ्याबाबत चर्चा झाली. पंतप्रधानांनी बैठकीत स्पष्ट इशारा दिला की, देशात साठेबाजी आणि काळाबाजार अजिबात सहन केली जाणार नाही. तसेच संबंधित मंत्र्यांना पुरवठा, वितरण आणि लॉजिस्टिक्स व्यवस्था मजबूत ठेवून आवश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.
 

Web Title : पीएम मोदी ने संसद में मध्य पूर्व संकट से उत्पन्न चुनौतियों पर बात की।

Web Summary : पीएम मोदी ने संसद को संबोधित करते हुए मध्य पूर्व संकट के प्रभाव पर चिंता व्यक्त की। उन्होंने आर्थिक, सुरक्षा और मानवीय चुनौतियों के बीच आवश्यक आपूर्ति सुरक्षित करने के प्रयासों का आश्वासन दिया। भारत ऊर्जा आयात में विविधता ला रहा है, आपूर्ति मार्गों की निगरानी कर रहा है, और नागरिकों के लिए आवश्यक वस्तुओं की निर्बाध पहुंच सुनिश्चित करने के लिए जमाखोरी पर कार्रवाई कर रहा है।

Web Title : PM Modi addresses parliament on challenges posed by Middle East conflict.

Web Summary : PM Modi addressed parliament, highlighting concerns over the Middle East conflict's impact. He assured efforts to secure essential supplies amidst economic, security, and humanitarian challenges. India is diversifying energy imports, monitoring supply routes, and cracking down on hoarding to ensure uninterrupted access to essential goods for citizens.