तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक; टीएमसीचा बहिष्कार, राहुल गांधी गैरहजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 18:33 IST2026-03-25T18:33:06+5:302026-03-25T18:33:35+5:30
Iran Israel US War: पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे.

तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक; टीएमसीचा बहिष्कार, राहुल गांधी गैरहजर
Iran Israel US War: पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले युद्ध आणि जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राजधानी दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत मध्यपूर्वेतील परिस्थिती, तेल-गॅस पुरवठा, आवश्यक सेवा आणि भारतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांवर चर्चा करण्यात येणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
या सर्वपक्षीय बैठकीची अध्यक्षता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत सांगितले की, पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सात अधिकारप्राप्त गटांची स्थापना करण्यात आली आहे. हे गट एलपीजी, आवश्यक सेवा, ऊर्जा पुरवठा आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर नियमित आढावा घेऊन सरकारला सूचना देणार आहेत.
टीएमसीचा बैठकीवर बहिष्कार, राहुल गांधी गैरहजर
तृणमूल काँग्रेस (TMC) ने या सर्वपक्षीय बैठकीचा बहिष्कार केला आहे. टीएमसीचे खासदार सौगत रॉय यांनी सांगितले की, आमची राजकीय लढाई भाजपसोबत आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या बैठकीत सहभागी होणार नाही. तर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या बैठकीला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितले की, केरळमध्ये कार्यक्रम असल्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत.
मात्र, ते सातत्याने केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका करत आहेत. राहुल गांधी म्हणाले की, देशाची परराष्ट्र नीती आता सरकारची वैयक्तिक नीती बनली आहे आणि यामुळे देशाला भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा
या बैठकीत मुख्यतः पश्चिम आशियातील युद्धस्थिती, तेल आणि गॅस पुरवठा, भारतातील महागाईवर परिणाम, परदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि ऊर्जा व व्यापारावरील परिणाम या विषयांवर चर्चा होणार आहे. विरोधी पक्षांचेही याबाबतचे सुचवलेले उपाय सरकार ऐकणार असल्याचे सांगितले जात आहे.
बैठकीत अनेक वरिष्ठ नेते उपस्थित
या सर्वपक्षीय बैठकीसाठी गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, बीजेडीचे सस्मित पात्रा, जेडीयूचे लल्लन सिंह आणि संजय झा, काँग्रेसचे तारिक अन्वर आणि मुकुल वासनिक सीपीआयएमचे जॉन ब्रिटास, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांच्यासह अनेक नेते बैठकीसाठी उपस्थित आहेत.