व्वा रे पठ्ठ्या! कमी गुणांमुळे शाळेने काढलं पण 'तो' खचला नाही; कष्टाने बदललं नशीब, झाला IPS
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:15 IST2025-04-08T12:13:33+5:302025-04-08T12:15:33+5:30
आकाश यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली. पण एक वेळ अशी होती जेव्हा दहावीत कमी गुण मिळाल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. पण ते खचले नाहीत, पुन्हा खंबीरपणे उभे राहिले.

व्वा रे पठ्ठ्या! कमी गुणांमुळे शाळेने काढलं पण 'तो' खचला नाही; कष्टाने बदललं नशीब, झाला IPS
प्रयत्न केल्यावर यश हे हमखास मिळतं. काही लोक संघर्ष करून, खूप मेहनत करून स्वतःची यशोगाथा स्वत:च लिहितात. आकाश कुलहरी यांनी देखील हे सिद्ध करून दाखवलं आहे. आकाश यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली. पण एक वेळ अशी होती जेव्हा दहावीत कमी गुण मिळाल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. पण ते खचले नाहीत, पुन्हा खंबीरपणे उभे राहिले.
कानपूरमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि प्रयागराजमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त अशा महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आयपीएस अधिकारी आकाश कुलहरी यांची गोष्ट सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आकाश यांनी त्यांचं शालेय शिक्षण बिकानेरमध्येच घेतलं.
"मी हार मानली नाही, कठोर परिश्रम केले"
१९९६ मध्ये आकाश यांनी १०वीची परीक्षा ५७% गुणांसह उत्तीर्ण केली. यामुळे त्यांच्या शाळेने त्यांना काढून टाकलं आणि पुन्हा प्रवेश दिला नाही. आकाश कुलहरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या निकालानंतर मला शाळेतून काढून टाकण्यात आलं. पण मी हार मानली नाही. उलट, मी कठोर परिश्रम केले आणि यश मिळवलं.
बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी घेतली मेहनत
आकाश यांनी बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली आणि ८५% गुण मिळवले. त्यामुळे त्यांच्या पालकांना त्यांचा अभिमान वाटला. २००१ मध्ये डूग्गल कॉलेज बिकानेर येथून बी.कॉम केलं. त्यानंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जेएनयू दिल्ली येथून एम.कॉम केलं.
पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी पास
आकाश कुलहरी यांनी एम.कॉम. पूर्ण करतानाच यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली. २००६ मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली. याआधी २००५ मध्ये त्यांनी जेएनयूमधून एम.फिल देखील केलं होतं. आयपीएस म्हणून ते बऱ्याच काळापासून वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत.