शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:01 IST2025-10-29T15:00:46+5:302025-10-29T15:01:27+5:30
IPS Sandeep Chaudhary : एकामागून एक १२ सरकारी नोकरीच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि आज देशात एका प्रतिष्ठित पदावर आहेत.

शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
जेव्हा तुमचा निश्चय दृढ असेल, तेव्हा तुम्ही आयुष्यात काहीही साध्य करू शकता. IPS संदीप चौधरी यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्यावर खूप लहान वयातच जबाबदाऱ्यांचा भार पडला होता. ते कॉलेजला गेले नाहीत किंवा कोचिंग घेतलं नाही, तरीही त्यांनी एकामागून एक १२ सरकारी नोकरीच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि आज देशात एका प्रतिष्ठित पदावर आहेत.
संदीप चौधरी हे पंजाबचे आहेत. फेब्रुवारी २००४ मध्ये त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यावेळी संदीप बारावीत होते. वडिलांच्या अचानक निधनानंतर सहा दिवसांनी त्यांनी प्रचंड मानसिक ताणतणावात बारावीची परीक्षा दिली. संदीप यांनी अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितलं. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी दररोज कॉलेजमध्ये जाण्याऐवजी इग्नूमध्ये प्रवेश घेतला. मुलांना शिकवायला सुरुवात केली.
पदवी मिळवल्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये क्लर्क पदासाठी अर्ज केला. ही त्यांची पहिली सरकारी नोकरी होती. संदीप यांनी नंतर अनेक स्पर्धात्मक परीक्षा दिल्या आणि यश मिळवलं. एमएच्या पहिल्या वर्षात असताना यूजीसी नेट परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ती उत्तीर्ण केली. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे आत्मविश्वास वाढला. पोस्ट ऑफिसच्या नोकरीनंतर कोचिंगशिवाय १० सरकारी नोकरीच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या. यामध्ये ६ बँक पीओ, एसएससी इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, बीएसएफ असिस्टंट कमांडंट, नाबार्ड, पंजाब सिव्हिल सर्व्हिस आणि इतर अनेकांचा समावेश आहे.
गुवाहाटीमध्ये असिस्टंट बँक मॅनेजर म्हणून काम करत असताना असं काहीतरी घडलं ज्यामुळे त्याचं आयुष्य बदललं. २०१० च्या यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यांच्या रूममेटने १३ वा रँक मिळवला. हा संदीप यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याचा संकल्प केला. काम करताना यूपीएससीची तयारी करणं सोपं नव्हतं, पण ते चिकाटीने काम करत राहिले.
२०१४ च्या यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत त्यांनी १५८ वा रँक मिळवला. हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता. संदीप चौधरी सध्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन (CICE) येथे पोलीस अधीक्षक (SP) म्हणून तैनात आहेत. त्यांना पाच वर्षांसाठी राष्ट्रीय तपास संस्थेत (NIA) पोलीस अधीक्षक (SP) म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. जर तुम्हाला खरोखर काही साध्य करायचे असेल तर प्रामाणिकपणे कठोर परिश्रम करा आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल असं देखील संदीप यांनी म्हटलं आहे.