चंडीगड : हरयाणातील हिसार येथून अटक करण्यात आलेली यू-ट्यूबर ज्योती मल्होत्रा ही भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यानही दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या संपर्कात होती, असे हिसारच्या पोलिस अधीक्षकांनी सांगितले. राष्ट्रीय तपास संस्था, गुप्तचर विभाग आणि लष्करी गुप्तचर अधिकारी ज्योती मल्होत्राची चौकशी करत आहेत.पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ज्योतीला ‘महत्त्वाची व्यक्ती’ म्हणून विकसित करत होते. ज्योतीचा लष्करी कारवायांशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी थेट संबंध किंवा प्रवेश नव्हता. परंतु तरीही ती थेट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या (पीआयओ) संपर्कात होती. हे आधुनिक युद्ध आहे जे फक्त सीमेवर लढले जात नाही. आम्हाला एक नवीन कार्यपद्धती आढळली ज्यामध्ये पीआयओ काही सोशल मीडिया इन्फ्ल्युअर्सना या युद्धात भरती करण्याचा प्रयत्न करत होते, असे हिसारचे पोलिस अधीक्षक शशांक कुमार सावन म्हणाले.
लॅपटॉपचे फॉरेन्सिक विश्लेषण सुरूपोलिसांनी सांगितले की, ज्योतीच्या लॅपटॉपचे फॉरेन्सिक विश्लेषण सुरू आहे, तसेच ते तिच्या संपर्कात असलेल्यांचीही चौकशी करतील.
उत्पन्न नसताना परदेश प्रवास कसा केला? पोलिस अधीक्षक सावन यांनी सांगितले की, ज्योतीच्या आर्थिक व्यवहारांची व प्रवासाच्या तपशीलांची चौकशीदेखील सुरू आहे. केंद्रीय संस्था, लष्करी गुप्तचर अधिकारी तिच्या प्रवासाची माहिती तपासत आहेत, कारण तिने पाकिस्तान, चीन व इतर काही देशांना भेटी दिल्याचे वृत्त आहे. कोणत्या देशांना, कोणत्या क्रमाने तिने भेट दिली हे पाहण्यासाठी घटनांची संपूर्ण साखळी आखण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्पन्नाचे ज्ञात स्रोत व प्रवास याचा मेळ बसत नाही.