२ लाख नीट परीक्षार्थींच्या डेटाचोरीची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:08 IST2018-07-25T00:08:15+5:302018-07-25T00:08:47+5:30
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची सीबीएसई अध्यक्षांकडे मागणी

२ लाख नीट परीक्षार्थींच्या डेटाचोरीची चौकशी करा
नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेस (नीट) बसलेल्या दोन लाख विद्यार्थ्यांच्या वैैयक्तिक माहितीची चोरी करुन ती काही वेबसाइटवर झळकविण्यात आली होती. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सीबीएसईच्या अध्यक्ष अनिता करवाल यांना पत्राद्वारे केली.
राहुल गांधी यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांच्या माहितीची यापुढे अशी चोरी होऊ नये म्हणून सीबीएसईने काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. देशातील १३६ शहरांमध्ये व ११ भाषांमध्ये सीबीएसइने नीट परीक्षा ६ मे रोजी घेतली होती व तिचा निकाल ४ जूनला जाहीर केला होता. नीट परीक्षेसाठी बसलेल्या दोन लाख विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहितीची चोरी करुन ती काही वेबसाइटवर कशी व कोणत्या हेतूने झळकविण्यात आली होती याविषयीच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. विद्यार्थ्यांची नावे, त्यांचे दूरध्वनी क्रमांक, इ-मेल आयडी असा सारा तपशील या वेबसाइटच्या हाती लागला होता.