आतील अन् बाहेरील शत्रू सक्रिय, कायम सतर्क राहा; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह; लक्ष ठेवून उपाययोजना करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 06:56 IST2024-12-31T06:55:35+5:302024-12-31T06:56:10+5:30
मध्य प्रदेशात इंदूर जिल्ह्यातील महू छावणीच्या दोन दिवसीय दौऱ्यात दुसऱ्या दिवशी लष्कराच्या जवानांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. या शत्रूंवर सतत लक्ष ठेवून त्यांच्याविरुद्ध योग्य वेळी ठोस पावले उचलण्याची गरज राजनाथसिंह यांनी प्रतिपादित केली.

आतील अन् बाहेरील शत्रू सक्रिय, कायम सतर्क राहा; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह; लक्ष ठेवून उपाययोजना करा
भोपाळ : सुरक्षेच्या आघाडीवर भारत फार नशीबवान नाही. कारण देशाचे लष्कर उत्तर आणि पश्चिम अशा दोन्ही सीमांवर सातत्याने आव्हानांचा सामना करीत असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. या स्थितीत अगदी शांत राहून चालणार नाही, कारण शत्रू आतला असो वा बाहेरचा, तो कायम सक्रिय राहतो, असेही त्यांनी नमूद केले.
मध्य प्रदेशात इंदूर जिल्ह्यातील महू छावणीच्या दोन दिवसीय दौऱ्यात दुसऱ्या दिवशी लष्कराच्या जवानांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. या शत्रूंवर सतत लक्ष ठेवून त्यांच्याविरुद्ध योग्य वेळी ठोस पावले उचलण्याची गरज राजनाथसिंह यांनी प्रतिपादित केली.
२०४७ पर्यंत भारताला एक पूर्ण विकसित आणि स्वयंपूर्ण देश घडवण्याच्या दृष्टीने आवश्यक तयारीवरही राजनाथसिंह यांनी भाष्य केले. यात लष्कराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून सतत सतर्क राहण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
प्रशिक्षण घेत असलेल्या जवानांचा केला गौरव
‘मी येथे आलो तेव्हा तुम्ही किती कठोर परिश्रमातून देशासाठी प्रशिक्षण घेत आहात ते मी पाहिले. हे युद्धापेक्षा कमी नाही.
आपल्याला देशात आणि बाहेर सक्रिय असलेल्या शत्रूंवर लक्ष ठेवून प्रभावी उपाययोजना कराव्या लागतील’, असे राजनाथसिंह यांनी नमूद केले. या केंद्रातील शिस्त तसेच प्रशिक्षण घेत असलेल्या जवानांचा राजनाथसिंह यांनी गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला.
संरक्षण उत्पादनांची निर्यात वाढली
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत भारतीय संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीची उलाढाल २ हजार कोटीं रुपयांवरून २१ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. २०२९ पर्यंत ही उलाढाल ५० हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. भारतात बनविलेली संरक्षण उत्पादने अनेक देशांमध्ये निर्यात केली जात आहेत. मेक इन इंडिया या मोहिमेद्वारे स्वदेशात उत्तम संरक्षण उत्पादने तयार केली जात आहेत, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
अशी आहे महूची लष्करी छावणी
- इंदूरहून २५ किमी दूर महू येथील लष्करी छावणीत तीन प्रमुख प्रशिक्षण संस्था आहेत.
- यात ‘आर्मी वॉर कॉलेज’, ‘मिलिट्री कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ आणि ‘इन्फ्रन्ट्री स्कूल’चा समावेश आहे.
- याशिवाय येथे संरक्षणविषयक संग्रहालय आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.