दृष्टी गेली, तरीही त्यांना देशच दिसतो; भारतीय जवानाची युनिसेफमध्ये निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 17:20 IST2019-02-13T17:19:31+5:302019-02-13T17:20:59+5:30
युनिसेफच्या मुख्यालयात नियुक्ती झालेले भारतातले पहिले दिव्यांग

दृष्टी गेली, तरीही त्यांना देशच दिसतो; भारतीय जवानाची युनिसेफमध्ये निवड
नवी दिल्ली: कट्टरतावाद्यांविरोधात कारवाई करताना दृष्टी गमावलेल्या भारतीय जवानाची संघर्षगाथा लष्करानं शेअर केली आहे. भारतीय लष्करानं शेअर केलेल्या या पोस्टला हजारो लाईक्स मिळाले आहेत. या पोस्टवर प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कट्टरतावाद्यांविरोधात कारवाई करताना मेजर गोपाल मित्रा यांनी दृष्टी गमावली. त्यामुळे मित्रा यांच्या आयुष्यात अंधार पसरला. मात्र याचा कोणताही बाऊ न करता, परिस्थितीमुळे खचून न जाता मित्रा यांनी संकटांशी दोन हात केले. यानंतर यूनिसेफच्या मुख्यालयात त्यांची नेमणूक झाली. यूनिसेफच्या मुख्यालयात नियुक्ती झालेले भारतातले ते पहिले दिव्यांग ठरले.
जम्मू-काश्मीरमध्ये 2000 मध्ये कट्टरतावाद्यांविरोधात कारवाई सुरू असताना आईडीचा स्फोट झाला. त्यामध्ये मित्रा यांची दृष्टी गेली. 'आईडीच्या स्फोटात दृष्टी गमावूनही मित्रा परिस्थितीसमोर झुकले नाहीत. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून समाजशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. याशिवाय त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून विकास व्यवस्थापनात एमएस्सीदेखील पूर्ण केली. आता मित्रा यूनिसेफच्या मुख्यालयात भारताचं प्रतिनिधीत्व करतात. भारताकडून यूनिसेफमध्ये नियुक्ती झालेले ते पहिले दिव्यांग आहेत,' अशा शब्दांमध्ये भारतीय लष्करानं मित्रा यांचा संघर्ष फेसबुक पोस्टमध्ये मांडला आहे.
गोपाल मित्रा 1995 मध्ये भारतीय लष्करात रूजू झाले. कट्टरतावाद्यांविरोधात राबवण्यात येणाऱ्या कारवायांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला. कुपवाड्यात कट्टरतावाद्यांविरोधात कारवाई सुरू असताना आयईडीचा स्फोट झाल्यानं त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर जवळपास दोन वर्षे त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया सुरू होत्या. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते लष्कराच्या पुनर्वसन शिबिरात दाखल झाले आणि परिस्थितीशी संघर्ष केला.