वंदे भारतच्या जेवणात किडे सापडल्यानंतर रेल्वेची हायस्पीड कारवाई; IRCTC ला १० लाखांचा दंड, कंत्राटही रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 10:11 IST2026-03-26T10:06:18+5:302026-03-26T10:11:11+5:30
वंदे भारतमध्ये किडे असलेले वरण आणि मुदतबाह्य दही दिल्याने एका प्रवाशाने तक्रार दिली होती.

वंदे भारतच्या जेवणात किडे सापडल्यानंतर रेल्वेची हायस्पीड कारवाई; IRCTC ला १० लाखांचा दंड, कंत्राटही रद्द
Railways Fines IRCTC: भारतीय रेल्वेची शान मानल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमधील खानपान सेवेचा दर्जा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पाटणा-टाटानगर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाला देण्यात आलेल्या जेवणात चक्क किडे आणि मुदतबाह्य दही आढळल्याची धक्कादायक घटना १५ मार्च २०२६ रोजी घडली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वेने आयआरसीटीसीवर १० लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, संबंधित कंत्राटदाराला ५० लाख रुपयांचा दणका देत त्याचे कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमकी घटना काय?
१५ मार्च रोजी गाडी संख्या २१८९६ (पाटणा-टाटानगर वंदे भारत एक्सप्रेस) मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने ऑनबोर्ड केटरिंग कर्मचाऱ्यांनी वाढलेल्या वरणात किडे असल्याचे निदर्शनास आणून दिले. इतकेच नाही तर प्रवाशांना देण्यात आलेले दही देखील मुदतबाह्य होते. प्रवाशाने या निकृष्ट अन्नाचा फोटो आणि तक्रार रेल्वे प्रशासनाकडे नोंदवली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच रेल्वे विभागात मोठी खळबळ उडाली.
रेल्वेची हायस्पीड कारवाई
तक्रार प्राप्त होताच रेल्वेने तातडीने चौकशी समिती नेमली. चौकशीत अन्नाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे सिद्ध झाल्यानंतर रेल्वेने कठोर पावले उचलली. भारतीय रेल्वेने स्वतःच्याच उपकंपनीवर म्हणजेच आयआरसीटीसीवर १० लाख रुपयांचा दंड लादला. तर संबंधित केटरिंग सर्व्हिस प्रोव्हायडरला ५० लाख रुपयांचा दणका दिला असून, त्याचे कंत्राट कायमचे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांची सुरक्षा आणि अन्नाचा दर्जा ही भारतीय रेल्वेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असे रेल्वे प्रवक्त्याने स्पष्ट केले.
रेल्वेच्या जेवणाचे 'रिपोर्ट कार्ड'
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे दरवर्षी सुमारे ५८ कोटी जेवण प्रवाशांना पुरवते. तक्रारींचे प्रमाण केवळ ०.०००८% इतके असले, तरी प्रत्येक तक्रार गांभीर्याने घेतली जाते. गेल्या तीन वर्षांत अशा तक्रारींनंतर रेल्वेने आतापर्यंत २.६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. मात्र, २०२५ मध्ये पँट्री कार कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांवर हल्ल्याच्या ३ घटना घडल्याने रेल्वेने आता शिस्तीचा बडगा उगारला आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून रिफॉर्म एक्सप्रेसची घोषणा
एकीकडे दंडात्मक कारवाई सुरू असतानाच, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २०२६ सालासाठी ५ नवीन सुधारणा मंजूर केल्या आहेत. यामुळे या वर्षातील एकूण सुधारणांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. यापैकी २ मालवाहतूक, १ बांधकाम आणि २ प्रवासी सुविधेशी संबंधित आहेत. पाचव्या क्रमांकाची सुधारणा मिठाच्या वाहतुकीवर लक्ष केंद्रित करते. भारतात वार्षिक ३५ दशलक्ष टन मीठ उत्पादन होते, ज्यापैकी केवळ ९.२ दशलक्ष टन रेल्वेद्वारे वाहतूक केली जाते. ही क्षमता वाढवण्यावर रेल्वे भर देणार आहे.