माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 21:41 IST2017-11-19T21:39:08+5:302017-11-19T21:41:05+5:30
माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना या वर्षीचा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना या वर्षीचा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास या क्षेत्रांतील भरीव कामगिरीसाठी हा पुरस्कार दरवर्षी इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टकडून दिला जातो.
2004 ते 2014 या काळात देशाचं पंतप्रधानपद सांभाळताना मनमोहन सिंग यांनी देशाचा मान जगभरात वाढवला. त्यासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मनमोहन सिंग यांच्या नावाची इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केली.
१० वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत भारताच्या आर्थिक-सामाजिक विकासात दिलेले भरीव योगदान, जगात भारताची प्रतिष्ठा उंचावणे, शेजारी व जगातील इतर महत्त्वाच्या देशांची सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे आणि दर्म, जात, भाषा वा पंथ यांचा विचार न करता सर्व सामान्य नागरिकांचे समाधान व सुरक्षेसाठी ससत झटणे यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांना गौरविण्यात येत असल्याचे ट्रस्टने म्हटले.
सलग पाच वर्षांचे दोन कालखंड यशस्वीपणे पूर्ण करणारे डॉ. सिंग हे भारताचे तिसरे पंतप्रधान आहेत व अमेरिकेसोबत झालेला नागरी अणु सुरक्षा करार व कोपनहेगन येथे झालेला जागतिक हवामान बदलाविषयीचा समझौता ही त्यांची भरीव कामगिरी ठरली, असेही ट्रस्टने नमूद केले.