इंडिगोची कार्यसंस्कृती अशी आहे...? माजी कर्मचाऱ्याचे ओपन लेटर व्हायरल; '₹18,000 पगारात 3 लोकांचे काम'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 11:29 IST2025-12-08T11:29:23+5:302025-12-08T11:29:49+5:30
IndiGo Crisis: वरिष्ठ व्यवस्थापनाने 'टाईम परफॉर्मेंस' (वेळेवर उड्डाण) ला अधिक महत्त्व दिले आणि पायलट आणि केबिन क्रूने सुरक्षेसंबंधी किंवा थकव्याबद्दल चिंता व्यक्त केल्यास, त्यांना धमकावले जात होते.

इंडिगोची कार्यसंस्कृती अशी आहे...? माजी कर्मचाऱ्याचे ओपन लेटर व्हायरल; '₹18,000 पगारात 3 लोकांचे काम'
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विमानसेवा विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले आहेत. या गोंधळामागे कर्मचाऱ्यांवरील प्रचंड कामाचा ताण आणि व्यवस्थापनाची विषारी संस्कृती कारणीभूत असल्याचे एका माजी कर्मचाऱ्याच्या व्हायरल झालेल्या ओपन लेटर'मधून उघड झाले आहे.
या पत्रात इंडिगोच्या अंतर्गत संकटाची धक्कादायक बाजू मांडण्यात आली आहे. कंपनीचा सध्याची ही समस्या एका रात्रीत झालेला नाही, तर 'वर्षांनुवर्षांच्या अहंकार, लोभ आणि कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे' ही स्थिती ओढवली, असा गंभीर आरोप पत्रात करण्यात आला आहे.
पत्रानुसार, इंडिगोमध्ये कार्यरत असलेल्या ग्राउंड स्टाफला अत्यंत कमी पगारात काम करावे लागत आहे. 'केवळ ₹16,000 ते ₹18,000 मासिक पगार असलेल्या या कर्मचाऱ्यांकडून तीन-तीन लोकांचे काम करून घेतले जाते,' असे यात नमूद केले आहे. हे कर्मचारी एका विमानातून दुसऱ्या विमानापर्यंत धावपळ करतात आणि थकव्यामुळे शारीरिक आणि मानसिकरित्या खचून गेले आहेत.
वरिष्ठ व्यवस्थापनाने 'टाईम परफॉर्मेंस' (वेळेवर उड्डाण) ला अधिक महत्त्व दिले आणि पायलट आणि केबिन क्रूने सुरक्षेसंबंधी किंवा थकव्याबद्दल चिंता व्यक्त केल्यास, त्यांना धमकावले जात होते. अनेकदा केबिन क्रूचे सदस्य प्रवाशांच्या समोर हसून काम करतात, पण नंतर विमानाच्या स्वयंपाकघरात जाऊन रडतात, अशी हृदयद्रावक स्थिती असल्याचेही यात नमूद आहे.
An open letter from @IndiGo6E pilots to people of India. https://t.co/yBr64JXXS7pic.twitter.com/AXtvkHu6D3
— AWCS (@AeroAwcs) December 6, 2025
कंपनीच्या उच्च पदांवर, जे योग्य ईमेल देखील लिहू शकत नाहीत, अशा लोकांना केवळ 'पॉवर आणि ESOPs' साठी बसवले गेले, ज्यामुळे मूळ टॅलेंट आणि अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना डावलले गेले, असा आरोपही या पत्रातून करण्यात आला आहे. इंडिगोच्या या 'ओपन लेटर'ने विमान वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे. पत्रात केंद्र सरकारला या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याची आणि ग्राउंड स्टाफसाठी किमान वेतन तसेच प्रत्येक विमानासाठी पुरेसा कर्मचारी असणे अनिवार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रावर इंडिगोकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.