इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 05:48 IST2025-12-14T05:48:18+5:302025-12-14T05:48:37+5:30
आदेशाला संबंधित प्राधिकरणासमोर आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार; आर्थिक स्थितीवर परिणाम होणार नसल्याचा कंपनीचा दावा

इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून विमान सेवेचा बोजवारा उडालेल्या आणि हजारो प्रवाशांना मनस्ताप भोगावा लागणाऱ्या इंडिगोविमान कंपनीला जीएसटीच्या एका प्रकरणात सुमारे ५९ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईवर इंडिगोने दिल्ली साऊथ कमिशन रेटमधील जीसीएसटीच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिलेला हा आदेश चुकीचा असून त्याविरोधात आम्ही संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करणार आहोत, असे सांगितले.
या कंपनीला लावण्यात आलेला दंड २०२०-२१ या आर्थिक वर्षातील असून वस्तू व सेवा करासंदर्भात (जीएसटी) तो लावण्यात आला. हा दंड ५८,७४,९९,४३९ रुपयांचा आहे. दरम्यान या आदेशाचा आमच्या आर्थिक स्थितीवर किंवा कामकाजावर लक्षणीय परिणाम होणार नसल्याचा दावा इंडिगोने केला आहे. शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर या विमान कंपनीने दंडाच्या आदेशाची माहिती शेअर बाजारांना दिली.
इंडिगो विमानाला रांची विमानतळावर 'टेल स्ट्राइक'
१. इंडिगोची विमानसेवा पूर्वपदावर येण्यास उशीर लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर रांची विमानतळावर या कंपनीच्या विमानाला 'टेल स्ट्राइक'च्या घटनेला सामोरे जावे लागले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. विमान उड्डाण करताना किंवा उतरताना त्याचा मागील भाग म्हणजे शेपूट धावपट्टीला लागणे किंवा आपटणे याला टेल स्ट्राईक म्हणतात.
२. भुवनेश्वर-रांची मार्गावर उड्डाण करणारे इंडिगोचे विमान रांची येथे शुक्रवारी रात्री साडेसात वाजता उतरत असताना ही घटना घडली. ७० प्रवासी असलेल्या या विमानाचा मागील भाग धावपट्टीला आदळल्याने मोठा धक्का बसल्याचा अनुभव प्रवाशांना आला. मात्र सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली.
३. या विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर विमान पुन्हा रांचीहून भुवनेश्वरला जाणार होते. पण ते उड्डाण रद्द करण्यात आले. त्यामुळे खोळंबा झालेल्या प्रवाशांपैकी काही जणांनी आपला प्रवास रद्द केला, काही जणांनी प्रवासाची तारीख बदलली तर काही जणांना रस्तेमार्गे भुवनेश्वरला पाठविण्यात आले.