विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 07:09 IST2025-12-08T07:08:46+5:302025-12-08T07:09:22+5:30
संचालक मंडळाकडून ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी आणि प्रवाशांकडून आकारण्यात आलेल्या अतिरिक्त रकमेची तत्काळ परतफेड सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
मुंबई :इंडिगोची शीर्ष कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनने मोठ्या प्रमाणावर रद्द करण्यात आलेली उड्डाणे आणि विलंबामुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष आपत्ती व्यवस्थापन गटाची स्थापना केली आहे. हा गट नियमित बैठका घेत परिस्थितीचा आढावा घेत राहील, अशी माहिती कंपनीने रविवारी दिली.
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
संचालक मंडळाकडून ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी आणि प्रवाशांकडून आकारण्यात आलेल्या अतिरिक्त रकमेची तत्काळ परतफेड सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. शनिवारी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स आणि मुख्य परिचालन अधिकारी इसिद्रो पोर्केरास यांना उड्डाणातील मोठ्या अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस डीजीसीएकडून देण्यात आली होती. सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशी समितीच्या अहवालानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
संचालकांसाठी स्वतंत्र बैठक
संचालकांसाठी स्वतंत्र बैठक घेण्यात आली आणि आपत्कालीन व्यवस्थापन गट स्थापन करण्याचा निर्णय झाला. या गटात अध्यक्ष विक्रमसिंह मेहता, संचालक ग्रेग सॅरेत्स्की, माईक व्हिटेकर, अमिताभ कांत आणि सीईओ पीटर एल्बर्स यांचा समावेश आहे. हा गट नियमितपणे बैठक घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवत असून, उड्डाणे सुरळीत करण्यासाठी आणि कार्यप्रणाली पूर्ववत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती व्यवस्थापनाकडून नियमितपणे दिली जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. एकूणच इंडिगोने आता गोंधळ कमी करून सेवा सुरळीत करण्याबाबत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.
पश्चिम रेल्वेचे हेल्पडेस्क विमानतळावर
पश्चिम रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी १ आणि टी २ टर्मिनलवर विशेष हेल्प डेस्क स्थापन केले आहेत. इंडिगोच्या विमान सेवेची मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. इंडिगोच्या रद्द झालेल्या उड्डाणांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मध्य आणि पश्चिम रेल्वे मिळून सुमारे ५० विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या विशेष गाड्या मुंबई-दिल्ली, मडगाव, नागपूर, बंगळुरू, लखनौ आणि गोरखपूर या मार्गांवर धावणार आहेत. प्रवाशांना पर्यायी प्रवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे कर्मचारी सतत समन्वय साधत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.