IndiGo: विमान रद्द झाल्याचं कळवलं नाही, राहण्याचीही सोय नाही; इंडिगोच्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 10:32 IST2025-12-05T10:31:22+5:302025-12-05T10:32:54+5:30
IndiGo Flight Cancelled News: इंडिगोने गुरुवारी एकाच दिवसात ५५० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द केली.

IndiGo: विमान रद्द झाल्याचं कळवलं नाही, राहण्याचीही सोय नाही; इंडिगोच्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक!
भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने गुरुवारी (४ डिसेंबर) एकाच दिवसात ५५० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द केली. याचा परिणाम हजारो प्रवाशांवर झाला. इंडिगोने २० वर्षांत एकाच दिवसात रद्द केलेल्या उड्डाणांची ही सर्वाधिक संख्या आहे. यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी इंडिगोच्या भोंगळ कारभारावर टीका केली.
इंडिगोच्या गोंधळामुळे झालेल्या त्रासाबाबत बोलताना एका तरुणीने संताप व्यक्त केला. ती म्हणाली की, "इंडिगोकडून विमान रद्द करत असल्याची कोणतीही पूर्वसूचना आम्हाला देण्यात आली नव्हती. आम्ही पहाटे ५ वाजल्यापासून जागे आहोत आणि जवळपास दोन तासांपासून विमानतळावर येऊन थांबलो आहोत. आम्हाला कोणतीही माहिती दिली जात नाहीये, आम्ही गेल्या अनेक तासांपासून रांगेत उभे आहोत. आम्हाला लग्नाला जायचे आहे, पण आम्हाला उद्या दुसऱ्या विमानाने पाठवले जाणार असल्याचे इंडिगोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. महत्त्वाचे म्हणजे, इंडिगोकडून आमची राहण्याची सोय करण्यात आली नाही."
#WATCH | A passenger says, "We were not informed that they are cancelling the flight...We have been awake since 5 am, and we have been waiting here for 2 hours. There is no information and we are standing in the queue for hours and now they are saying that they will not even… https://t.co/SlZgHzGcdBpic.twitter.com/8WNU4McLEh
— ANI (@ANI) December 5, 2025
एकाच दिवसात ५५० हून अधिक उड्डाणे रद्द
इंडिगोने गुरुवारी ५५० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द केली. यापैकी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर सुमारे १७२ उड्डाणे रद्द करण्यात आली. मुंबई विमानतळावर आणखी ११८ उड्डाणे रद्द करण्यात आली. याचबरोबर बेंगळुरूमध्ये- १००, हैदराबादमध्ये- ७५, कोलकातामध्ये- ३५, चेन्नईमध्ये- २६ आणि गोव्यात ११ उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, देशातील इतर विमानतळांवरही इंडिगोची अनेक उड्डाणे रद्द झाली आहेत. एअरलाईनच्या सेवा व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
इंडिगोने मागितली माफी
इंडिगोच्या निवेदनात म्हटले आहे की, "गेल्या दोन दिवसांत इंडिगोच्या नेटवर्कमध्ये व्यत्यय आला आहे. आम्ही आमच्या प्रवाशांना त्यांच्या नियोजित उड्डाणांमध्ये कोणत्याही बदलांची माहिती देत आहोत आणि त्यांना अपडेट राहण्याचा सल्ला देण्यात आला." तर, इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर अल्बर्ट यांनी प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.