भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 19:17 IST2025-05-23T19:16:34+5:302025-05-23T19:17:03+5:30
Indigo Flight News: संकटसमयी पाकिस्तानने दिलेला नकार यामुळे २२७ प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता, अशा परिस्थितीत भारतीय हवाई दलाने सर्व सूत्रे हाती घेत मोर्चा सांभाळला आणि विमानाला श्रीनगरमध्ये उतवण्यात महत्त्वाची भूमिका निभावल्याची महत्त्वपूर्ण माहिती आता समोर आली आहे.

भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण
दिल्लीहून श्रीनगरला जाणारं इंडिगो कंपनीचं एक विमान बुधवारी मोठ्या वादळात सापडल्याने त्या विमानातून प्रवास करत असलेल्या शेकडो प्रवाशांचे प्राण संकटात सापडले होते. समोर वादळ घोंघावत असल्याने विमानातील वैमानिकाने पाकिस्तानमधील हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्यांच्या हवाई काही काळ त्यांच्या हवाई हद्दीतून जाऊ देण्याची विनंती केली होती. मात्र पाकिस्तानने त्याला नकार दिला होता. एकीकडे वादळ आणि दुसरीकडे संकटसमयी पाकिस्तानने दिलेला नकार यामुळे २२७ प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता, अशा परिस्थितीत भारतीय हवाई दलाने सर्व सूत्रे हाती घेत मोर्चा सांभाळला आणि विमानाला श्रीनगरमध्ये उतवण्यात महत्त्वाची भूमिका निभावल्याची महत्त्वपूर्ण माहिती आता समोर आली आहे.
भारतीय हवाई दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधीन नागरी हवाई वाहतूक यंत्रणेने भारतातील नागरी आणि लष्करी विमानांवर पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे लाहोर येथील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने इंडिगोच्या विमानाला परवानगी नाकारली. त्यानंतर भारतीय नॉर्दन एरिया कंट्रोलने इंडिगोच्या वैमानिकाला सल्ला देत दिल्ली नियंत्रण कक्षाशी संपर्क प्रस्थापित केला. आणीबाणीच्या काळात उपयोगी ठरेल म्हणून या वैमानिकाल लाहोर कंट्रोलची फ्रिक्वेंसी देण्यात आली. मात्र परवानगी नाकारण्यात आल्यानंतर विमानाला पर्यायी मार्गाने श्रीनगरकडे वळवण्यात आले. येथूनच भारतीय हवाई दलाने सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आणि वैमानिकाला रियल टाईम कंट्रोल वेक्टर आणि ग्राऊंड स्पिड अपडेट देऊन विमानाला सुरक्षितपणे श्रीनगरमध्ये उतरवले.
या विमानासोबत नेमकं काय घडलं होतं.
इंडिगोचे विमान 6E 2142 बुधवारी (२१ मे) श्रीनगरकडे जात असताना गारपीट आणि वादळाच्या तडाख्यात सापडले होते. त्यामुळे जोरात हादरे जाणवू लागल्याने विमानातील प्रवाशी घाबरून गेले होते. वादळाच्या तडाख्यातून बचावासाठी वैमानिकाने लाहौरच्या हवाई नियंत्रण कक्षाला संपर्क केला. वादळातून वाचण्यासाठी थोड्या वेळासाठी पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश करून देण्याची परवानगी मागितली, पण लाहौरच्या नियंत्रण कक्षाने ती अमान्य केली होती.
या घटनेनंतर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने चौकशी सुरू केली आहे. डीजीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, इंडिगोच्या विमानाला गारपीट आणि वादळाच्या तडाख्यातून जावे लागले. त्यामुळे वैमानिकांनी इमर्जन्सी स्थिती असल्याचे जाहीर केले होते. पण, वैमानिकांनी सुरक्षितपणे विमान उतरवले. या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू करण्यात येत आहे.