इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 15:11 IST2025-12-13T15:10:34+5:302025-12-13T15:11:33+5:30
रांची विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली. इंडिगो एअरलाईन्सच्या एका विमानाचं लँडिंग होत असताना 'टेल स्ट्राइक' झाला.

इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
रांची विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली. इंडिगो एअरलाईन्सच्या एका विमानाचं लँडिंग होत असताना 'टेल स्ट्राइक' झाला. भुवनेश्वरहून रांचीला येत असलेल्या इंडिगोच्या फ्लाईटमध्ये सुमारे ७० प्रवासी होते. सुदैवाने, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही आणि सर्वजण सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे.
न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही घटना शुक्रवारी संध्याकाळी सुमारे ७:३० वाजता घडली, जेव्हा विमान रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर उतरत होते. लँडिंगच्या वेळी विमानाचा मागील भाग अर्थात 'टेल' रनवेला धडकला, ज्यामुळे प्रवाशांना अचानक जोरदार झटका बसला. विमानात असलेल्या प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं, क्रू मेंबर्सनी त्वरित परिस्थिती हाताळली.
रांची विमानतळाचे संचालक विनोद कुमार यांनी सांगितलं की, 'टेल स्ट्राइक'च्या घटनेनंतर विमानाची तांत्रिक तपासणी करण्यात आली. तपासणीत विमान उड्डाणासाठी तांत्रिकदृष्ट्या अयोग्य आढळलं, त्यानंतर ते तात्काळ पुढील उड्डाणांसाठी थांबवण्यात आलं. सुरक्षा मानकांना लक्षात घेऊन विमानाला पुढील उड्डाणांसाठी परवानगी देण्यात आली नाही.
या घटनेमुळे रांचीहून भुवनेश्वरला जाणारी इंडिगोची पुढील फ्लाईट रद्द करावी लागली. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. विमानतळ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला, तर काहींनी रीशेड्यूल केलं. त्याचबरोबर काही प्रवाशांना पर्यायी व्यवस्थेअंतर्गत भुवनेश्वरला पाठवण्यात आलं.
विमान वाहतूक तज्ञांच्या मते, 'टेल स्ट्राइक' ही एक गंभीर तांत्रिक घटना मानली जाते, ज्यामध्ये विमानाचा मागील भाग रनवेला धडकतो. अशा परिस्थितीत विमानाची सविस्तर तपासणी आवश्यक असते, जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळता येईल. इंडिगो एअरलाईन्स आणि विमानतळ प्रशासन सध्या या घटनेच्या कारणांची चौकशी करत आहेत.