'इंडिगो' प्रकरणानंतर सरकार सावध, अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी केंद्राची राज्यसभेतून मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 15:23 IST2025-12-08T15:22:30+5:302025-12-08T15:23:24+5:30
Indigo Flight Crisis: इंडियोसारखं विमान संकट पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. तसेच या विमान संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांनी केंद्र सरकारच्या वतीने राज्यसभेमध्ये मोठं विधान केलं आहे.

'इंडिगो' प्रकरणानंतर सरकार सावध, अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी केंद्राची राज्यसभेतून मोठी घोषणा
गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रमुख विमान वाहतूक कंपनी असलेल्या इंडिगोची शेकडो उड्डाणं रद्द होत असल्याने त्याचा फटका लाखो प्रवाशांना बसत आहे. या विमान संटकामुळे विमानतळांवर तासनतास होत असलेला खोळंबा, इतर विमानांचे भडकलेले तिकीटदर यामुळे केंद्र सरकारलाही टीकेचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर इंडियोसारखं विमान संकट पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. तसेच या विमान संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांनी केंद्र सरकारच्या वतीने राज्यसभेमध्ये मोठं विधान केलं आहे.
राममोहन नायडू म्हणाले की, इंडिगोमध्ये जी गडबड होत आहे, ती कुठल्याही सरकारी चुकीमुळे नाही तर या विमान कंपनीकडून निर्माण करण्यात आलेली ऑपरेशन समस्या आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालय सातत्याने इंडिगोच्या संपर्कात होतं. तसेच १ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत नव्या वैमानिक ड्युटी नियमांबाबत एअरलाईनकडून विचारण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे दिलं गेलं होतं. इंडिगो कंपनी आपलं रोस्टर सांभाळू शकली नाही. ही चूक स्पष्टपणे इंडिगोच्या अंतर्गत व्यवस्थेशी संबंधित आहे.
राममोहन नायडू यांनी पुढे सांगितले की, भविष्यात अशी समस्या निर्माण होऊ नये यासाठी इंडिगोमधील या ऑपरेशनल चुकांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तयार करण्यात आलेले वैमानिकांच्या ड्युटीचे नियम १ नोव्हेंबरपासून लागू झाले असून, त्यानुसार प्रत्येक कंपनीला ते लागू करणे बंधनकारक होते. या माध्यमातून केवळ इंडिगोच नाही तर सर्वच हवाई वाहतूक क्षेत्राला एक उदाहरण प्रस्तूत केलं जाईल, असेही नायडू यांनी सांगितले. तसेच आम्ही वैमानिक आणि संपूर्ण सिस्टिमच्या सुरक्षेसाठी गंभीर आहोत. त्यामुळे सर्व विमान कंपन्यांना या नियमांचं पालन करावंच लागेल, असेही नायडू यांनी स्पष्ट केलं.
मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण
देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो एका मोठ्या ऑपरेशनल संकटातून जात आहे. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर उड्डाणं रद्द करावी लागली असून आता त्यांना सरकारी कारवाईचा सामनाही करावा लागू शकतो. गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या या संकटामुळे अनेक प्रवाशांना त्रास झाला आहे आणि कंपनीच्या प्रतिमेलाही नुकसान पोहोचलं आहे. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे शेअर्स १६% नं घसरले आहेत. या दरम्यान कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये ३७,००० कोटी रुपयांची मोठी घट झाली आहे.