"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 12:04 IST2025-12-13T12:03:00+5:302025-12-13T12:04:55+5:30
इंडिगो एअरलाइनची फ्लाईट रद्द झाल्यानंतर रोहतक येथील एका वडिलांनी जो निर्णय घेतला, ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
इंडिगो एअरलाइनची फ्लाईट रद्द झाल्यानंतर रोहतक येथील एका वडिलांनी जो निर्णय घेतला, ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. रोहतकच्या मायना गावचे रहिवासी असलेले राजनारायण पंघाल यांचा मुलगा आशिष बारावीमध्ये आहे. आशिषची प्री-बोर्ड परीक्षा इंदूरमध्ये होणार होती. राजनारायण मुलाला घेऊन दिल्ली विमानतळावर पोहोचले, तेव्हा त्यांना कळलं की इंडिगोची फ्लाईट रद्द झाली आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाची परीक्षा होती, त्यामुळे वडिलांनी लगेच कारने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी सुमारे ८०० किलोमीटरचा प्रवास संपूर्ण रात्रभर कार चालवून पूर्ण केला. मायना गावचा युवा नेमबाज आणि इंदूरमधील प्रतिष्ठित डेली कॉलेजचा विद्यार्थी आशिष बारावीचा विद्यार्थी आहे. तो सुट्ट्यांमध्ये रोहतक येथील आपल्या मायना गावी आला होता.
इंडिगोची फ्लाईट झाली कॅन्सल
८ डिसेंबरपासून त्याची प्री-बोर्ड परीक्षा सुरू होणार होती. त्याआधी ६ डिसेंबरच्या संध्याकाळी त्याला इंदूरच्या डेली कॉलेजमध्ये सन्मानित केलं जाणार होतं. त्याचे वडील राजनारायण यांनी त्याला दिल्ली विमानतळावरून इंदूरला घेऊन जाण्याचा प्लॅन केला होता. ते विमानतळावर पोहोचताच त्यांना कळले की इंडिगोची फ्लाईट कॅन्सल झाली आहे.
"मला झोपही येत होती"
राजनारायण पंघाल म्हणाले, "विमानतळावर जसा सूर्य मावळत गेला, तशी माझी चिंता वाढत गेली आणि मी गाडी घेऊन इंदूरच्या दिशेने निघालो. मुलगा कारमध्ये अभ्यास करत राहिला. आम्ही घरी देखील नंतर सांगितलं की आम्ही गाडीनेच निघालो होतो. आम्ही सतत प्रवास करत होतो. मला झोपही येत होती. पहाटे चारच्या आसपास दोन-तीनदा झोप लागल्यासारखं झालं. मी कार बाजूला थांबवली, डोळ्यांवर पाणी मारलं, चहा प्यायलो आणि नंतर हळू-हळू पन्नास-साठच्या वेगाने गाडी चालवली. सकाळी सात वाजता मी मुलाला सोडलं."
"मला माझा मुलगा दिसत होता"
"जर आम्ही ८०० किलोमीटर जायचे आहे असा विचार करून निघालो असतो, तर कदाचित तो प्रवास मी पूर्ण करू शकलो नसतो... पण मला माझा मुलगा दिसत होता... त्याची परीक्षा दिसत होती. त्यामुळे माझ्यामध्ये इतकी हिंमत आली की मी रात्रभर गाडी चालवू शकलो." फ्लाईट रद्द झाल्यामुळे इतर प्रवाशांनाही त्रास झाला असेल. "मला माझा मुलगा दिसत होता. त्याची परीक्षा दिसत होती. हीच माझी हिंमत आणि प्रेरणा होती. हे धोकादायक होतं. कोणालाही असा सल्ला देणार नाही, पण आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता" असं राजनारायण यांनी म्हटलं आहे.