पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या Indigo विमानाला पक्षी धडकला; १७५ प्रवासी प्रचंड घाबरले, पुढे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:29 IST2025-07-09T12:27:35+5:302025-07-09T12:29:10+5:30
Indigo : सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या Indigo विमानाला पक्षी धडकला; १७५ प्रवासी प्रचंड घाबरले, पुढे...
Indigo : गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच, बुधवारी(दि.९) बिहारच्या पाटण्याहून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाची इमर्जन्सी लँडिंगची घटना घडली आहे. पक्ष्याने विमानाला धडक दिल्यामुळे विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, विमानात एकूण १७५ प्रवासी होते. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली.
सविस्तर माहिती अशी की, बुधवारी सकाळी पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानात (उड्डाण क्रमांक IGO5009) तांत्रिक बिघाड झाला. यानंतर, विमानाला पटणाच्या जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर परत उतरवण्यात आले. पक्षी धडकल्याने विमानाच्या एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
अधिकाऱ्यांनी काय म्हटले?
पाटणा विमानतळाने या घटनेबाबत एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये म्हटले की, भारतीय वेळेनुसार सकाळी ८:४२ वाजता पाटणाहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या उड्डाणानंतर लगेचच विमानाला पक्ष्याची धडक बसली. तपासादरम्यान, धावपट्टीवर एक मृत पक्ष्याचे तुकडे आढळले. अप्रोच कंट्रोल युनिटद्वारे विमानाला याची माहिती देखील देण्यात आली. अप्रोच कंट्रोल युनिटकडून एका इंजिनमध्ये कंपन झाल्यामुळे विमानाला पाटणाला परतण्याची विनंती करण्यात आल्याचा संदेश मिळाला. स्थानिक स्टँड-बाय घोषित करण्यात आला आणि भारतीय वेळेनुसार सकाळी ९:०३ वाजता विमान रनवे ७ वर सुरक्षितपणे उतरले.
प्रवासी घाबरले
विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व १७५ प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. उड्डाणाची तपासणी केली जाईल. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्यासाठी एअरलाइन्सकडून पर्यायी व्यवस्था केली जाईल. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.