घातक कोरोनाचा धोका भारतालाही; चीनची विमानसेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 05:20 AM2020-01-30T05:20:58+5:302020-01-30T05:25:01+5:30

चीनमधून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या ३० देशांची यादी साऊथहॅम्प्टन विद्यापीठातील संशोधकांनी तयार केली आहे.

India's risk of a deadly corona; China's airline closed | घातक कोरोनाचा धोका भारतालाही; चीनची विमानसेवा बंद

घातक कोरोनाचा धोका भारतालाही; चीनची विमानसेवा बंद

Next

नवी दिल्ली : अत्यंत घातक कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या ३० देशांत भारताचाही समावेश आहे. कोरोनाने माजविलेला हाहाकार लक्षात घेऊन एअर इंडिया व इंडिगोसह सर्व भारतीय विमान कंपन्यांनी चीनशी विमानांची सेवा १४ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनमधून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या ३० देशांची यादी साऊथहॅम्प्टन विद्यापीठातील संशोधकांनी तयार केली आहे. त्यात कोरोनाचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका सर्वप्रथम थायलंड, जपान, हाँगकाँगला आहे. या यादीत अमेरिका सहाव्या व भारत २३ व्या क्रमांकावर आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा ज्या शहरांना सर्वाधिक धोका आहे त्यामध्ये बँकॉक, हाँगकाँग व तैवानमधील ताईपेईचा समावेश आहे. चीनमध्ये बीजिंग, गुआंगझोऊ, शांघाय, चोंगकिंग यासह १८ शहरांत या विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. कोरोनाची सुरुवात चीनमधील ज्या वुहान शहरातून झाली, तेथील सुमारे ५० लाख लोकांनी स्थलांतर केले आहे.
इंडिगो एअरलाइन्सने बंगळुरू-हाँगकाँग मार्गावरील विमानसेवा १ फेब्रुवारीपासून तर दिल्ली ते चेंगडू मार्गावरील विमानसेवा १ ते २० फेब्रुवारीपर्यंत स्थगित केली आहे. मात्र कोलकाता ते गुआंगझोऊ दरम्यानची विमानसेवा इंडिगो सुरूच ठेवणार आहे. एअर इंडियाने दिल्ली-शांघाय मार्गावरील विमानसेवा ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

चीनमध्ये १३२ जणांचा बळी
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनमध्ये आतापर्यंत १३२ जण मरण पावले असून, या विषाणूची ६ हजारांहून अधिक लोकांना लागण झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. येत्या दहा दिवसांत संसर्गाचे प्रमाण आणखी वाढणार असून, त्यामुळे बळींची संख्याही वाढण्याची भीती आहे.
विषाणूची लागण झालेल्यांपैकी १२३९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याशिवाय ९२३९ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आहे. या विषाणूचा संसर्ग झालेल्या पण उपचारानंतर संपूर्ण बरे झालेल्या १०३ जणांना रुग्णालयांतून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Web Title: India's risk of a deadly corona; China's airline closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.