भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 11:14 IST2025-09-24T10:28:43+5:302025-09-24T11:14:07+5:30

भारताचा एकमेव सक्रिय ज्वालामुखी अंदमान-निकोबारमधील बॅरन बेटावर असून, त्याचा पुन्हा उद्रेक झाल्याची घटना घडली आहे.

India's only active volcano suddenly erupts! Earthquake felt in Andaman | भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला

भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला

भारताचा एकमेव सक्रिय ज्वालामुखी अंदमान-निकोबारमधील बॅरन बेटावर असून, त्याचा पुन्हा उद्रेक झाल्याची घटना घडली आहे. १३ आणि २० सप्टेंबर रोजी या बेटावर दोन हलके स्फोट झाले. या स्फोटांमुळे कोणतीही मोठी हानी झाली नसली, तरी या भागात ४.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. भारतीय नौदलाने या उद्रेकाचे व्हिडीओदेखील रेकॉर्ड केले आहेत.

भारताचा एकमेव सक्रिय ज्वालामुखी

बॅरन बेट हे अंदमान समुद्रात असलेले एक छोटेसे बेट आहे. हे बेट पूर्णपणे एका ज्वालामुखीने तयार झाले असून, येथे मानवी वस्ती नाही. हे बेट पोर्ट ब्लेअरपासून १४० किलोमीटर दूर आहे. हा ज्वालामुखी बंगालच्या उपसागरात इंडियन आणि बर्मा या टेक्टॉनिक प्लेट्सच्या टक्करमुळे तयार झाला आहे. समुद्राच्या पातळीपासून त्याची उंची ३५४ मीटर आहे. हे बेट भूवैज्ञानिकांसाठी संशोधनाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.

८ दिवसांत दोन स्फोट

या ठिकाणी १३ सप्टेंबरला पहिला स्फोट झाला, ज्यातून धूर आणि राख बाहेर पडली. त्यानंतर २० सप्टेंबरला दुसरा स्फोट झाला. हे स्फोट 'स्ट्रॉम्बोलियन' प्रकारात मोडतात, जे सौम्य पण सतत होत असतात. भारतीय नौदलाने २० सप्टेंबरच्या स्फोटाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे, ज्यात लाव्हाचा प्रवाह दिसत आहे.

या उद्रेकामुळे अंदमानमध्ये ४.२ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला, मात्र बेटाच्या आसपास किंवा पोर्ट ब्लेअरमध्ये कोणतीही मोठी हानी झाली नाही.

बॅरन बेटाचा इतिहास

या बेटावरील ज्वालामुखीचा पहिला उद्रेक १७८९ मध्ये नोंदवला गेला होता. तेव्हापासून त्यात वेळोवेळी स्फोट होत आले आहेत. १९९१ मध्ये एक मोठा उद्रेक झाला होता, ज्यात लाव्हा खूप दूरपर्यंत वाहिला होता. त्यानंतर २०१७ आणि २०१८ मध्येही तो सक्रिय झाला होता.

भविष्यातील धोके आणि खबरदारी

सध्या तरी या उद्रेकांमुळे कोणताही मोठा धोका नाही. मात्र, जास्त राख बाहेर पडल्यास सागरी जीवनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मासे आणि प्रवाळ बेटांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच, हवाई प्रवासावरही परिणाम होऊ शकतो. या बेटाचे निरीक्षण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि नौदल करत असून, जर उद्रेक तीव्र झाला तर लगेचच इशारा जारी केला जाईल.

Web Title: India's only active volcano suddenly erupts! Earthquake felt in Andaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.