पूर्णपणे स्वदेशी बनावटीची देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन तयार; जाणून घ्या फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:49 IST2025-12-11T13:47:45+5:302025-12-11T13:49:20+5:30
First Hydrogen Train: ही जगातील सर्वात लांब आणि सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

पूर्णपणे स्वदेशी बनावटीची देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन तयार; जाणून घ्या फीचर्स...
Indian Railway: भारतीय रेल्वेने हायड्रोजनवर चालणारी देशातील पहिली ट्रेन चालवण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिलेल्या लिखित उत्तरात सांगितले की, देशाची पहिली हायड्रोजन ट्रेन RDSO (रिसर्च, डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन) च्या मानकांनुसार संपूर्णतः स्वदेशी पद्धतीने तयार करण्यात आली आहे.
जींदमध्ये तयार होणार ग्रीन हायड्रोजन प्लांट
हायड्रोजनवर चालणारी ही ट्रेन सर्वात शक्तिशाली आणि सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन असून, भारताचे इंजिनीअरिंग सामर्थ्य दर्शवते. ट्रेन चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनासाठी हरियाणातील जींद येथे इलेक्ट्रोलिसिस आधारित हायड्रोजन उत्पादन प्रकल्प उभारला जात आहे. रेल्वेसाठी ही एक महत्त्वाची पायाभूत सुविधा ठरणार आहे. या पूर्णपणे स्वदेशी डिझाईन व विकासामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेलाही चालना मिळाली आहे.
Manufacturing of India’s First Hydrogen-Powered Train-Set Completed; Green Hydrogen Production Plant Based on Electrolysis Process Being Established at Jind
— PIB India (@PIB_India) December 10, 2025
Indigenously Designed Hydrogen Train-Set Demonstrates Atmanirbhar Bharat; Presently the World’s Longest and Most Powerful… pic.twitter.com/C5NalayZal
कशी असेल ट्रेन?
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितल्यानुसार, ही जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन (10 कोच) असेल. ही ट्रेन ब्रॉड गेजवर चालेल आणि ट्रेनमध्ये दोन ड्रायव्हिंग पॉवर कार (DPC) असून, प्रत्येकाची क्षमता 1200 kW, तर एकूण क्षमता 2400 kW असेल.
या ट्रेनमध्ये 8 प्रवासी कोच जोडण्यात आले आहेत. या ट्रेनचे एकमेव उत्सर्जन जलवाष्प असल्याने ती पूर्णपणे शून्य-कार्बन उत्सर्जन तंत्रज्ञानावर आधारित राहील. हायड्रोजन ट्रॅक्शन हे नेक्स्ट-जनरेशन फ्यूल तंत्रज्ञान असून, हा प्रकल्प भारतीय रेल्वेसाठी मोठा टप्पा ठरेल.