भारताचा शत्रू थरथर कापणार! नौदलाची ताकद वाढणार; १७ युद्धनौका आणि ९ पाणबुड्यांचा होणार समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:15 IST2025-07-08T12:14:15+5:302025-07-08T12:15:44+5:30
Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद आता आणखी वाढणार आहे. सरकारने ७ नवीन युद्धनौका आणि ९ पाणबुड्यांना मंजुरी देण्याची तयारी केली आहे.

भारताचा शत्रू थरथर कापणार! नौदलाची ताकद वाढणार; १७ युद्धनौका आणि ९ पाणबुड्यांचा होणार समावेश
Indian Navy New Warships : भारतीय नौदलाच्या ताकदीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याच्या दिशेने सरकार महत्त्वपूर्ण पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच १७ नवीन युद्धनौका आणि ९ अत्याधुनिक पाणबुड्यांच्या कामाला मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या ही सर्व प्रकल्प विविध मंजुरी प्रक्रियांमधून जात आहेत.
सध्या देशातच ६१ युद्धनौका आणि पाणबुड्यांचे काम विविध टप्प्यांत सुरू असून, "आत्मनिर्भर भारत" उपक्रमाअंतर्गत ही सर्व जहाजं भारतातच तयार केली जात आहेत.
७० हजार कोटींचे दोन महत्त्वाचे प्रकल्प
प्रकल्प १७बी अंतर्गत, अंदाजे ७०,००० कोटी रुपयांच्या खर्चाने सात पुढच्या पिढीच्या फ्रिगेट्स आणि दोन बहुउद्देशीय जहाजं बांधली जाणार आहेत. तसेच, प्रकल्प ७५ (I) अंतर्गत, ७०,००० कोटी रुपये खर्च करून सहा अत्याधुनिक पाणबुड्या तयार करण्याची योजना आहे.
याशिवाय, प्रकल्प ७५ अॅड-ऑन अंतर्गत सुमारे ३६,००० कोटी रुपयांच्या खर्चाने तीन स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुड्याही बांधल्या जातील.
८ नवीन कॉर्व्हेट्सची तयारी
भारतीय नौदलासाठी आठ नवीन पुढच्या पिढीच्या कॉर्व्हेट्स तयार करण्याचंही नियोजन आहे, ज्यावर सुमारे ३६,००० कोटी रुपये खर्च केला जाईल. या सर्व प्रकल्पांचा एकूण खर्च २.४० लाख कोटी रुपयांहून अधिक असण्याचा अंदाज आहे.
जुन्या प्लॅटफॉर्मना नवी जागा
या नवीन युद्धनौका व पाणबुड्या सध्या कार्यरत असलेल्या जुन्या प्लॅटफॉर्मची जागा घेतील. केवळ धोका लक्षात घेऊन नव्हे तर भविष्यातील तांत्रिक क्षमता वाढविण्यावरही या प्रकल्पांचा भर आहे.
चीनच्या नौदलाला उत्तर देण्याची रणनीती
चीनच्या पीएलए नौदलाकडे सध्या ३५५ हून अधिक युद्धनौका व पाणबुड्या आहेत, ज्यामुळे ते जगातील सर्वात मोठं नौदल बनलं आहे. याच्या तुलनेत, भारतीय नौदलाकडे सुमारे १३० जहाजं आणि पाणबुड्या आहेत. त्यामुळे आधुनिक आणि कार्यक्षम नौदलाची गरज अधिक तीव्र झाली आहे. सध्या नौदलाच्या ताफ्यात १२ जुन्या पाणबुड्या अजूनही सेवेत आहेत. आता त्यात ६ स्कॉर्पिन वर्गातील स्वदेशी पाणबुड्यांचा समावेश करण्यात आला आहे.
२०३५ पर्यंत १७५ जहाजांचं लक्ष्य!
भारतीय नौदलाने २०३५ पर्यंत एकूण १७५ जहाजांचा ताफा उभारण्याचं लक्ष्य निश्चित केलं आहे. त्यासाठी आता वेगाने पावलं उचलली जात आहेत. बहुउद्देशीय विध्वंसक, पाणबुड्या आणि कॉर्व्हेट्ससारख्या जहाजांच्या मदतीने भारत समुद्रातील आपली उपस्थिती आणि सामर्थ्य लक्षणीयरीत्या वाढवण्याच्या तयारीत आहे.