न्यूक्लिअर पॉवरसाठी भारताचं मोठं पाऊल; PM मोदी, अजीत डोवाल AEC मध्ये! जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 11:52 IST2025-01-14T11:51:52+5:302025-01-14T11:52:50+5:30
अमेरिकेने भारतीय अणुसंस्थांवर लादलेले जुने निर्बंध हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे...

न्यूक्लिअर पॉवरसाठी भारताचं मोठं पाऊल; PM मोदी, अजीत डोवाल AEC मध्ये! जाणून घ्या सविस्तर
केंद्र सरकारने अणुऊर्जा आयोगाची (AEC) पुनर्रचना केली आहे, यात टीव्ही सोमनाथन आणि मनोज गोयल यांचा समावेश आहे. दोघेही कॅबिनेट सचिव आणि खर्च सचिव या पदावर असणार आहेत. गेल्या वर्षी २१ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या आणि ९ जानेवारी रोजी राजपत्रात प्रकाशित झालेल्या अधिसूचनेनुसार, एईसीमध्ये पंकज कुमार मिश्रा यांचाही समावेश आहे त्यांनी गेल्या वर्षी सदस्य (वित्त) म्हणून पदभार स्वीकारला होता.
कुणाकुणाला मिळाले स्थान? -
अणुऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती हे पुनर्रचित एईसीचे अध्यक्ष अशतील. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, पंतप्रधानांचे मुख्य सचिव प्रमोद कुमार मिश्रा, परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री, सोमनाथन आणि गोविल हे आयोगाचे पदसिद्ध सदस्य आहेत.
इतर सदस्यांमध्ये एईसीचे माजी अध्यक्ष एम आर श्रीनिवासन आणि अनिल काकोडकर, माजी विज्ञान आणि तंत्रज्ञान सचिव पी रामाराव, माजी प्रमुख सल्लागार (डीएई) रवि बी ग्रोवर आणि अंतरिक्ष आयोगाचे माजी अध्यक्ष के. कस्तूरीरंगन यांचा समावेश आहे. भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक विवेक भसीन हे देखील आयोगाचे पदसिद्ध सदस्य आहेत. AEC अणुऊर्जा विभागासाठी धोरणे तयार करण्याचे काम करते.
अमेरिका भारतावरील अणु निर्बंध हटवणार -
महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने भारतीय अणुसंस्थांवर लादलेले जुने निर्बंध हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील ऊर्जा संबंध आणखी मजबूत होतील. याशिवाय, २० वर्षे जुन्या ऐतिहासिक अणु कराराला नवीन गती मिळेल. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांनी नुकतीच नवी दिल्ली भेटीदरम्यान ही घोषणा केली.
सुलिव्हन यांनी म्हटले होते, "भारत आणि अमेरिकन कंपन्यांमधील नागरी अणु सहकार्यात अडथळा आणणारे नियम अमेरिका हटवत आहे. यासंदर्भातील औपचारिकता लवकरच पूर्ण केली जाईल. यामुळे दोन्ही देशांमधील अणु सहकार्याच्या नव्या संधी खुल्या होतील."