'या' व्यक्तीच्या शरीरात एक, दोन नव्हे तर ५ किडनी; काम करते १, बाकी ४ कुठून आल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:19 IST2025-02-21T15:18:24+5:302025-02-21T15:19:02+5:30
२०१० साली डॉक्टरांनी पहिल्यांदा देवेंद्र यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट केले होते.

'या' व्यक्तीच्या शरीरात एक, दोन नव्हे तर ५ किडनी; काम करते १, बाकी ४ कुठून आल्या?
नवी दिल्ली - प्रत्येक मनुष्याच्या शरीरात २ किडनी असतात, काही जण १ किडनी गरजवंताला दानही करू शकतात कारण एका किडनीवरही आपलं शरीर काम करू शकते. मात्र नवी दिल्लीत ४७ वर्षीय वैज्ञानिक देवेंद्र बारलेवार यांच्या शरीरात दोन नाही तर ५ किडनी आहेत. हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल परंतु हे सत्य आहे. देवेंद्र केंद्रीय संरक्षण मंत्रालयात वैज्ञानिक म्हणून काम करतात.
देवेंद्र यांच्या शरीरात ५ किडनी कशा आल्या हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला बातमीत मिळेल. देवेंद्र बारलेवार यांचं याआधी तीनदा किडनी ट्रान्सप्लांट झाले आहे. त्यांची ५ पैकी केवळ एक किडनी काम करत होती. टाइम्स ऑफ इंडियानुसार, देवेंद्र बारलेवार दीर्घ काळापासून क्रोनिक किडनी रोगाने ग्रस्त आहेत. त्यांना वेळोवेळी डायलिसिस करण्याची गरज भासते. २०१० साली डॉक्टरांनी पहिल्यांदा देवेंद्र यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट केले होते. त्यांना पहिली किडनी त्यांच्या आईकडून मिळाली. हे किडनी ट्रान्सप्लांट यशस्वी झालं होते आणि त्यांना जवळपास वर्षभर डायलिसिसची गरज पडली नाही.
२०१२ साली पुन्हा एकदा देवेंद्र यांचं दुसरं किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या एका नातेवाईकाने त्यांना किडनी दान केली. त्यानंतर २०२२ पर्यंत सर्वकाही सुरळीत सुरू होते, किडनी योग्यरित्या काम करत होती. परंतु कोविड झाल्यानंतर देवेंद्रला पुन्हा डायलिसिस करावं लागले. तेव्हापासून ते डायलिसिसच्या आधारे जीवन जगत आहेत. २०२३ साली एका मृत व्यक्तीने अवयव दान केले तेव्हा देवेंद्रला तिसऱ्यांदा किडनी मिळाली. ही किडनी ब्रेन डेड डोनरने दिली होती. याचवर्षी जानेवारीत किडनी ट्रान्सप्लांट केले, त्यानंतर १० दिवसांनी देवेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आलं. आता त्यांची किडनी सामान्यपणे काम करत आहे.
३ वेळा मिळाली किडनी
अमृता हॉस्पिटलचे यूरोलॉजी प्रमुख डॉ. अनिल शर्मा म्हणाले की, किडनी ट्रान्सप्लांट हा जोखमेचा असतो. दीर्घकालीन क्रोनिक किडनी आजाराने आणि अयशस्वी किडनी ट्रान्सप्लांटने रूग्णाच्या जीवाला धोका असतो. आधीच ४ किडनी असताना पाचवी किडनी लावणं धोक्याचे असते. देवेंद्र बारलेवार यांना पाचव्यांदा किडनी यशस्वीरित्या लावली आहे. बारलेवार यांचं नशीब खूप चांगले, त्यांना तीन किडनी मिळाल्या. इथं लोकांना १ किडनी मिळणेही आव्हानात्मक असते.
किडनी ट्रान्सप्लांट काय असतं?
किडनी ट्रान्सप्लांट एक सर्जरी असते. खराब किडनी डोनरच्या किडनीत बदलली जाते. किडनी ट्रान्सप्लांटनंतरही लोक सामान्य जीवन जगू शकतात. बहुतांश लोक ट्रान्सप्लांट केल्यानंतर ३ महिन्यात बरे होतात. जर कुणी जिवंत माणसाने किडनी दान केली तर ट्रान्सप्लांट २०-२५ वर्ष यशस्वी टिकते. मृत व्यक्तीने दान केलेली किडनी १५-२० वर्ष चालते. कुठल्याही व्यक्तीचे ३ वेळा किडनी ट्रान्सप्लांट होणे हैराण करणारे आहे कारण मॅचिंग डोनर मिळणे सहज सोपे नसते.