CoronaVirus News : आजपासून पॅसेंजर ट्रेनसाठी बुकिंग सुरू; पण, यासाठी काय करावं लागेल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 13:19 IST2020-05-11T13:04:13+5:302020-05-11T13:19:52+5:30
CoronaVirus News : या ट्रेन नवी दिल्लीतून देशातील १५ विविध शहरांपर्यंत धावणार आहेत.

CoronaVirus News : आजपासून पॅसेंजर ट्रेनसाठी बुकिंग सुरू; पण, यासाठी काय करावं लागेल?
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने १२ मेपासून स्पेशल पॅसेंजर ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे. या ट्रेन नवी दिल्लीतून देशातील १५ विविध शहरांपर्यंत धावणार आहेत. या पॅसेंजर ट्रेनसाठी प्रवाशांना ११ मे रोजी दुपारी ४ वाजल्यापासून बुकिंग सुरू होईल. मात्र, रेल्वे स्टेशनच्या तिकिट काऊंटरद्वारे या तिकिटांचे बुकिंग केले जाणार नाही.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १२ मे पासून धावणाऱ्या या ट्रेनचे तिकिट बुकिंग केवळ ऑनलाइन माध्यमातून केले जाणार आहे. यासाठी रेल्वे तिकिट एजंट आणि स्टेशन खिडकीतून तिकिट उपलब्ध होणार नाही. तसेच, प्लॅटफॉर्मची तिकिटे मिळणार नाहीत. याशिवाय, तत्काळ व प्रीमियम तत्काळचीही सुविधा दिली नाही आणि करेंट तिकिटाचीही सोय नसणार आहे.
ट्रेनचे तिकीट कोठे मिळणार?
भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार, प्रवासी या ट्रेनचे https://www.irctc.co.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आज दुपारी 4 वाजल्यापासून तिकिटे बुक करू शकतात. तसेच, ही सुविधा रेल्वे अॅपवरही उपलब्ध होणार आहे. म्हणजेच प्रवासी आयआरसीटीसी अॅपद्वारे तिकिटेही बुक करू शकतील. ट्रेनच्या एका कोचमध्ये ७२ सीट्स असतात, या सर्व सीट्सचे बुकिंग होणार आहे.
कोण प्रवास करू शकेल?
फक्त कंफर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच या ट्रेनमध्ये प्रवेश मिळणार आहे. प्रवासासाठी प्रवाशांना रेल्वे सुटण्याच्या वेळेच्या एक तासाच्या आधी स्टेशनवर पोहोचावे लागणार आहे. तसेच, प्रवाशांना मास्क लावणं बंधनकारक असणार आहे.
स्टेशनवर प्रवाश्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल
स्टेशनवर प्रवाश्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर प्रवासी पूर्णपणे निरोगी आढळल्यास प्रवासासाठी त्याला परवानगी दिली जाईल. प्रवासादरम्यान ट्रेन कमीत कमी स्टेशनवर थांबेल. या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे ब्लँकेट, बेडशीट व टॉवेल इत्यादी दिले जाणार नाही.
ट्रेनचे भाडे किती असेल?
ट्रेनचे सर्व कोच एसी असतील आणि त्यांचे भाडेही राजधानी ट्रेनसारखेच असणार आहे. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन लागू आहे. त्यामुळे देशातील सर्व पॅसेंजर ट्रेन सेवा 25 मार्चपासून बंद आहे.
कुठून-कुठे धावणार?
या विशेष ट्रेन नवी दिल्लीतून दिब्रूगढ, आगरताळा, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी या शहरांमध्ये धावणार आहेत.