Indian Railways cancels all passenger trains till March 31 due to coronavirus kkg | Coronavirus: मोठा निर्णय! ३१ मार्चपर्यंत रेल्वेकडून सर्व प्रवासी गाड्या रद्द

Coronavirus: मोठा निर्णय! ३१ मार्चपर्यंत रेल्वेकडून सर्व प्रवासी गाड्या रद्द

नवी दिल्ली: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रेल्वेनं मोठा निर्णय घेतलाय. ३१ मार्चपर्यंतच्या सर्व प्रवासी गाड्या रेल्वे मंत्रालयानं रद्द केल्या आहेत. या काळात एक्स्प्रेस, पॅसेंजर, इंटरसिटी अशा सर्व गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवसांमध्ये केवळ मालगाड्या सुरू राहतील. लांब पल्ल्यांच्या गाड्यांसोबतच उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतूकदेखील बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत मुंबईतील लोकल सेवादेखील बंद राहणार आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रेल्वेनं लांब पल्ल्याची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असेल. रेल्वे बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र आवश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी मालगाड्या सुरू असतील. तर मुंबईतील लोकल सेवा आज रात्रीपर्यंत सुरू असेल. यानंतर ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लोकल सेवा बंद करण्यात येईल.
कोरोनाबाधित देशांमधून आलेले, क्वॉरेंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आलेले अनेक जण रेल्वेतून प्रवास करत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत. याशिवाय मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये राहणारे लाखो परप्रांतीय कोरोनाच्या भीतीनं त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकांमध्ये गर्दी करू लागले. त्यामुळे रेल्वे गाड्यांमधील गर्दीदेखील वाढलीय. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यताही वाढतेय. याच पार्श्वभूमीवर लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतलाय.

मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या सतत वाढत असल्यानं बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालमधून आलेले परप्रांतीय मोठ्या संख्येनं त्यांच्या गावी जात आहेत. त्यामुळे त्या राज्यांमधील आरोग्य सेवेवर ताण पडण्याची दाट शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बाहेरुन येणाऱ्या ट्रेनवर बंदी घालण्याची मागणी केली होती. इतरही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून अशाच प्रकारची मागणी केली जाण्याची शक्यता होती. त्याच्या आधीच रेल्वे मंत्रालयानं सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

Web Title: Indian Railways cancels all passenger trains till March 31 due to coronavirus kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.