Indian Railway: प्रवाशांसाठी बंद होणार हे रेल्वेस्टेशन, मंदिर ठरणार कारण, नेमका काय प्रकार? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 15:31 IST2022-04-27T15:30:43+5:302022-04-27T15:31:03+5:30
Indian Railway: एका मंदिरामुळे रेल्वे स्टेशन बंद करावे लागणार असल्याचे विचित्र प्रकरण सध्या उत्तर प्रदेशमध्ये चर्चेत आहे. आग्रा येथील राजा की मंडी रेल्वे स्टेशन प्रवाशांसाठी बंद करण्यात येणार आहे. स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असलेल्या एका मंदिरावरून चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर डीआरएमनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

Indian Railway: प्रवाशांसाठी बंद होणार हे रेल्वेस्टेशन, मंदिर ठरणार कारण, नेमका काय प्रकार? जाणून घ्या
लखनौ - एका मंदिरामुळे रेल्वे स्टेशन बंद करावे लागणार असल्याचे विचित्र प्रकरण सध्या उत्तर प्रदेशमध्ये चर्चेत आहे. आग्रा येथील राजा की मंडी रेल्वे स्टेशन प्रवाशांसाठी बंद करण्यात येणार आहे. स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असलेल्या एका मंदिरावरून चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर डीआरएमनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. डीआरएमनी सांगितले की, जर चामुंडा देवी मंदिर हटवण्यात आलं नाही तर स्टेशनचा उपयोग प्रवासी वाहतुकीसाठी करता येणार नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असलेलं हे मंदिर अनधिकृतरीत्या बांधण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
डीआरएमच्या या भूमिकेवरून भक्तांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यांनी सांगितले की, मंदिराला हटवण्यावरून विनाकारण बहाणेबाजी केली जात आहेत. तर रेल्वेने सांगितले की, मंदिरामुळे प्रवाशांना ये जा करण्यात अडथळे येत आहेत. तसेच त्यामुळे ट्रेनचा वेगही कमी होतो. आता हे मंदिर स्थलांतरीत करावे यासाठी मंदिर प्रशासनाला नोटिसही देण्यात आली आहे.
आग्रा रेल्वे मंडळाने सांगितले की, मंदिरामुळे रेल्वे लाइनला वक्राकार करण्यात आले आहे. परिणामी कुठलीही ट्रेन येथून ३० किमी प्रतितास वेगापेक्षा अधिक वेगाने जाऊ शकत नाही. एवढंच नाही तर हायस्पीड ट्रेननाही येथून जाणे कठीण होते. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच त्यांचा वेळही वाया जातो. त्यामुळे मंदिर येथून स्थलांतरित करणे आवश्यक आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजा मंडी स्टेशनच्या काही भागावर चामुंडा देवीचं मंदिर बांधलेलं आहे. त्याचं क्षेत्रफळ हे सुमारे १७१६ चौमीटर आहे. त्याचं क्षेत्रफळ ६०० चौमीटर भागात मंदिर आहे. त्याचा ७२ चौमीटर भाग हा प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आहे. ही बाब रेल्वेच्या शेड्युल ऑफ डायमेंशनचं उल्लंघन आहे, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने चुकीचे आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे केवळ अतिक्रमण हटवण्याचे करत आहे. जर या कामामध्ये काही अडचण आली तर प्रवाशांच्या सुरक्षेची बाब विचारात घेऊन हे स्टेशन प्रवासी उपयोगासाठी बंद करण्यात आले आहे.