मेल-एक्स्प्रेसमधून हटवण्यात येणार स्लिपर कोच, रेल्वेने आखला प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 20:12 IST2020-10-11T20:07:20+5:302020-10-11T20:12:19+5:30
Indian Railway News : लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमधील डब्यांच्या रचनेमध्ये बदल करण्याचा विचार रेल्वेकडून सुरू आहे. रेल्वेच्या या धोरणानुसार लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमधून स्लिपर कोच पूर्णपणे हटवण्यात येणार आहेत. याचाच अर्थ अशा गाड्यांमध्ये केवळ एसी बोगी असतील.

मेल-एक्स्प्रेसमधून हटवण्यात येणार स्लिपर कोच, रेल्वेने आखला प्लॅन
नवी दिल्ली - भारतीय रेल्वेकडूनरेल्वे नेटवर्कला अपग्रेड करण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. सुवर्ण चतुष्कोन योजनेंतर्गत लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमधील डब्यांच्या रचनेमध्ये बदल करण्याचा विचार रेल्वेकडून सुरू आहे. रेल्वेच्या या धोरणानुसार लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमधून स्लिपर कोच पूर्णपणे हटवण्यात येणार आहेत. याचाच अर्थ अशा गाड्यांमध्ये केवळ एसी बोगी असतील. अशा प्रकारच्या गाड्यांचा वेग १३० ते १६० किमी प्रतितास राहील. मेल, एक्स्प्रेस ट्रेनमधील १३० किमी प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने चालणाऱ्या नॉन एसी कोसमध्ये तांत्रिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या सर्व ट्रेनमधील स्लिपर कोच हटवण्यात येणार आहेत.
लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सघ्या ८३ एसी कोच लावण्याचा प्रस्ताव आहे. मात्र या वर्षाच्या अखेरीस अशा कोचची संख्या वाढवून १०० करण्यात येईल. मात्र पुढील वर्षी कोचची संख्या वाढवून २०० पर्यंत नेण्याची योजना आहे. म्हणजेच पुढील काळात प्रवास अधिकाधिक आरामदायक आणि कमी वेळात पूर्ण होणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे या मेल, एक्स्प्रेससाठीचे भाडेही सामान्य एसी कोचच्या तुलनेत कमी ठेवण्याचा विचार आहे.
मात्र स्लिपर कोच हटवण्यात येणार याचा अर्थ नॉन एसी कोच पूर्णपणे हटवले जातील, असे नाही. मात्र नॉन एसी कोच असलेल्या ट्रेनचा वेग हा एसी ट्रेनपेक्षा कमी असेल. मिळालेल्या माहितीनुसार अशा ट्रेन ११० किमी प्रतितास वेगाने चालवल्या जातील. हे संपूर्ण काम क्रमवार पद्धतीने केले जाईल. तसेच नव्या अनुभवातून शिकून पुढील योजना आखली जाईल.
यापूर्वी भारतीय रेल्वेने बुधवारी ३९ नव्या पॅसेंजर ट्रेन चालवण्यास परवानगी दिली आहे. या सर्व ट्रेन स्पेशल ट्रेनच्या रूपात चालवण्यात येणार आहेत. रेल्वेकडून या सर्व ३९ ट्रेनची यादी जाहीर झाली आहे. मात्र या ट्रेन कधीपासून चालवण्यात येणार याची माहिती देण्यात आलेली नाही.