अरे देवा! लोको पायलट स्टेशनवर ट्रेन थांबवायलाच विसरला; चूक लक्षात येताच केलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 20:10 IST2023-10-19T20:07:16+5:302023-10-19T20:10:40+5:30
रेल्वेचा एक अजब कारनामा समोर आला आहे. स्टेशनवर बसलेले प्रवासी ट्रेन कधी थांबते याची वाट पाहत बसले पण ट्रेन थांबलीच नाही. ती वेगाने पुढे निघून गेल्याची घटना समोर आली आहे.

अरे देवा! लोको पायलट स्टेशनवर ट्रेन थांबवायलाच विसरला; चूक लक्षात येताच केलं असं काही...
भारतीय रेल्वेचा एक अजब कारनामा समोर आला आहे. स्टेशनवर बसलेले प्रवासी ट्रेन कधी थांबते याची वाट पाहत बसले पण ट्रेन थांबलीच नाही. ती वेगाने पुढे निघून गेल्याची घटना समोर आली आहे. ईशान्य रेल्वेच्या वाराणसी रेल्वे विभागाशी हे प्रकरण संबंधित आहे. बुधवारी छपरा ते फारुखाबाद ही ट्रेन (15083) संध्याकाळी सहा वाजता छपरा जंक्शनवरून वेळेवर निघाली.
ट्रेन यानंतर पुढच्या स्टॉपवर थांबली जिथून प्रवासी ट्रेनमध्ये चढले. यानंतर ट्रेन मांझी स्टेशनसाठी रवाना झाली. ट्रेन मांझी स्टेशनवर थांबणार होती तेव्हा ट्रेनचा वेग कमी होण्याऐवजी वाढू लागला. ज्या प्रवाशांना रेल्वेने पुढील प्रवास करावा लागला. त्यांच्यात एकच गोंधळ उडाला.
रेल्वेच्या लोको पायलट व इतर कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ सरयू नदीवरील रेल्वे पुलावर ट्रेन थांबवली. यानंतर रेल्वे चालकाने अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ट्रेन पुन्हा मांझी स्टेशनवर नेण्यात आली. जिथे वाट पाहणारे प्रवासी ट्रेनमध्ये बसले.
रेल्वे पुलावर 20 मिनिटे थांबली ट्रेन
रेल्वे पुलावर सुमारे 20 मिनिटे ट्रेन थांबली. पुलावर ट्रेन उभी असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याची दखल घेत वाराणसी रेल्वे विभागाचे डीआरएम विनीत श्रीवास्तव यांनी तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
"जे तथ्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल"
या प्रकरणी ईशान्य रेल्वेच्या वाराणसी रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार यांनी फोनवर सांगितले की, काल संध्याकाळी छपरा जंक्शनवरून निघालेल्या छपरा फारुखाबाद ट्रेनमध्ये ही घटना घडली. डीआरएम वाराणसी यांनी तपासाच्या सूचना दिल्या आहेत. जे काही तथ्य समोर येईल, त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल.