भारतीय नौदलाचा नवा ‘शिकारी’!; सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज ‘तारागिरी’ लवकरच ताफ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 05:40 IST2026-03-22T05:39:50+5:302026-03-22T05:40:31+5:30
ही भारतीय लष्कराच्या आत्मनिर्भरतेची एक उत्तुंग झेप ठरणार आहे.

भारतीय नौदलाचा नवा ‘शिकारी’!; सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज ‘तारागिरी’ लवकरच ताफ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या ताफ्यात लवकरच ‘तारागिरी’ ही अत्याधुनिक आणि स्वदेशी बनावटीची ‘स्टेल्थ फ्रिगेट’ (युद्धनौका) सामील होणार आहे. ३ एप्रिल रोजी विशाखापट्टणम येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत एका विशेष सोहळ्यात ही युद्धनौका नौदलात कार्यान्वित (कमिशन) केली जाईल. ‘प्रोजेक्ट १७ए’ अंतर्गत बांधण्यात आलेली ही चौथी शक्तिशाली युद्धनौका असून, ती भारताच्या सागरी सार्वभौमत्वासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.
नौदलाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘तारागिरी’ केवळ युद्धच नाही, तर आपत्ती निवारण आणि मानवतावादी कार्यांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
भारतीय उद्योगांचे बांधणीत योगदान
या युद्धनौकेच्या निर्मितीमध्ये २०० हून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे योगदान असून, त्यातून हजारो भारतीयांना रोजगार मिळाला आहे. ‘भारतीयांनी डिझाइन केलेली, भारतीयांनी बांधलेली आणि भारतीयांद्वारे चालवली जाणारी’ ही युद्धनौका ‘विकसित भारता’च्या दिशेने पडलेले एक मोठे पाऊल आहे. या युद्धनौकेत वापरण्यात आलेले ७५ टक्क्यांहून अधिक भाग स्वदेशी आहेत. भारताच्या सागरी शक्तीचे प्रतीक म्हणून ती सज्ज झाली आहे.
‘तारागिरी’ची वैशिष्ट्ये कोणती?
सुमारे ६,६७० टन वजनाची ‘तारागिरी’ युद्धनौका मुंबईतील ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’ने तयार केली आहे. या युद्धनौकेची सर्वांत मोठी ताकद म्हणजे रडारला सहजपणे चकवा देण्याची तिची क्षमता आणि त्यावरील सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम पल्ल्याची विमानविरोधी क्षेपणास्त्रे आणि पाणबुडीविरोधी आधुनिक प्रणालीमुळे ही युद्धनौका समुद्रातील एक घातक ‘शिकारी’ ठरणार आहे. ही भारतीय लष्कराच्या आत्मनिर्भरतेची एक उत्तुंग झेप ठरणार आहे.