आता चीनचं 'टेन्शन' वाढणार, भारताची ताकद पहिल्यांदाच रशियात दिसणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 15:33 IST2020-06-15T15:30:35+5:302020-06-15T15:33:19+5:30
विशेष म्हणजे रशियाच्या पंतप्रधानांनी या कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आमंत्रित केलं आहे.

आता चीनचं 'टेन्शन' वाढणार, भारताची ताकद पहिल्यांदाच रशियात दिसणार!
नवी दिल्लीः भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या तुकड्या रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोच्या रेड स्क्वेअरमध्ये कसरती करताना पाहायला मिळणार आहेत. 2015मध्ये झालेल्या अशाच परेडवेळी फक्त भारताच्या लष्करानं सहभाग घेतला होता. परंतु यंदा भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या तुकड्या यात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे रशियाच्या पंतप्रधानांनी या कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आमंत्रित केलं आहे. कोरोनाच्या संकटापायी पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत, परंतु तिन्ही सैन्य दलाच्या तुकड्या या कार्यक्रमात भारताची ताकद जगाला दाखवणार आहेत.
भारताचं सैन्य रशियात जाऊन परेड करणार असल्यानं रशियाशी सलोख्याचे संबंध असलेल्या चीनच्या चिंताही वाढल्या आहेत. रशिया दरवर्षी 9 मे रोजी विजय दिन परेड आयोजित करते. यावर्षी कोरोनामुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे. ही परेड 1945मध्ये नाझींच्या जर्मनीनं आत्मसमर्पण केल्याच्या स्मरणार्थ साजरी केली जाते. गेल्या वर्षी व्लादिवोस्तोक येथे झालेल्या बैठकीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान मोदी यांना यावर्षी येण्याचे आमंत्रण दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी गैरहजेर राहणार असले तरी या परेडमध्ये भाग घेण्यासाठी 19 जूनला नौदल, हवाईदल आणि लष्कराचे 75-80 जवान मॉस्कोला पाठविण्यात येणार आहे.
यावर्षीच्या परेडसाठी रशियाने अनेक देशांच्या प्रमुखांना आमंत्रित केले, कारण यावर्षी नाझींवर विजय मिळवण्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जाणार आहे. भारताच्या तिन्ही दलांचं सैन्य यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून, जगालाही ते पाहता येणार आहे. सध्या परेडसाठी काम सुरू आहे. रशियाचे चीनशी सखोल सैन्य आणि राजकीय संबंध आहेत, तर सध्या सीमेवरील वादावरून भारत आणि चीनमधील तणाव वाढत आहे. त्याचबरोबर भारताचेही अमेरिकेशी चांगले संबंध आहेत. त्याच वेळी चीन आणि अमेरिका यांच्यात संघर्ष आहे. ही सर्व समीकरणे असूनही भारत आणि रशिया एकमेकांना महत्त्वाचे सहयोगी म्हणून पाहतात. रशियाबरोबर संरक्षण सहकार्य सतत वाढवण्याच्या प्रतिबद्धतेव्यतिरिक्त लष्करी उपकरणे एकत्रितपणे विकसित करण्याचे भारतानं करार केलेले आहेत.
हेही वाचा
भारत-नेपाळमध्ये रोटी-बेटीचं नातं, जगातील कोणतीही ताकद ते तोडू शकत नाही- राजनाथ सिंह
आठ वर्षे विम्याचे हप्ते भरल्यास विमा कंपनीला द्यावा लागणार क्लेम, Irdaiचे आदेश
पोस्टाच्या सहा जबरदस्त योजना; लॉकडाऊनच्या काळात गुंतवणूक करा अन् मिळवा मोठा लाभ