कॅबिनमध्ये शेवटचा दिसला अन्...; आईला कॉल केल्यानंतर काही तासांतच मर्चेंट नेव्ही ऑफिसर मॉरिशसजवळून बेपत्ता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:11 IST2026-02-06T13:01:50+5:302026-02-06T13:11:59+5:30
ओडिशातील मर्चेंट नेव्हीचा भारतीय कॅडेट समुद्रात बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.

कॅबिनमध्ये शेवटचा दिसला अन्...; आईला कॉल केल्यानंतर काही तासांतच मर्चेंट नेव्ही ऑफिसर मॉरिशसजवळून बेपत्ता!
Sarthak Mohapatra: मर्चेंट नेव्हीतून एका भारतीय तरुणाबाबत एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. ओडिशामधील भद्रक जिल्ह्याचा रहिवासी असलेला सार्थक महापात्र हा ईए जर्सी या जहाजावरून गूढरित्या बेपत्ता झाला आहे. ही घटना ३ फेब्रुवारी २०२६ रोजी मॉरिशसच्या सागरी क्षेत्रात घडली असून, त्याच्या गायब होण्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सार्थक महापात्र हा एंग्लो-ईस्टर्न शिप मैनेजमेंट कंपनीत कॅडेट म्हणून कार्यरत आहे. त्याचे जहाज पश्चिम आफ्रिकेहून सिंगापूरच्या दिशेने परतत होते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारीच्या सकाळी ६:१५ वाजता सार्थकला शेवटचे त्याच्या केबिनमध्ये जाताना पाहिले गेले होते. सकाळी ८:३० च्या सुमारास जेव्हा चीफ ऑफिसर त्याच्या केबिनमध्ये गेले, तेव्हा केबिन रिकामी होती. जहाजावर अलार्म वाजवून शोधमोहीम राबवण्यात आली, परंतु सार्थकचा कुठेही पत्ता लागला नाही.
"कोणीतरी मुद्दाम लपवलंय"; आईचा संशय
सार्थकची आई रश्मिता महापात्र यांनी या घटनेवर गंभीर संशय व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, २ फेब्रुवारीच्या रात्री सार्थकने व्हिडिओ कॉलवर कुटुंबाशी आणि मित्रांशी संवाद साधला होता. तो खूप आनंदी होता आणि त्याला त्याच्या कामात कोणतीही अडचण नव्हती. "भरसमुद्रात चालत्या जहाजावरून एक व्यक्ती आपल्या खोलीतून अचानक कशी काय गायब होऊ शकते? हा घातपाताचा प्रकार वाटतोय. कोणातरी त्याला मुद्दाम लपवून ठेवले आहे किंवा हे एका सुनियोजित कटाचा भाग आहे," असा सवाल रश्मिता यांनी केला.
सार्थक गेल्या १६ महिन्यांपासून आपली इंटर्नशिप पूर्ण करत होता. त्याच्या प्रशिक्षणाचे केवळ दोन महिने शिल्लक होते. ही त्याची शेवटची सागरी सफर होती, ज्यानंतर तो थर्ड ऑफिसर या पदावर पोहोचणार होता. मात्र, त्यापूर्वीच तो बेपत्ता झाल्याने कुटुंब कोलमडून पडले आहे.
सोशल मीडियावरून मदतीची हाक
सार्थक यांच्या आईने एक्सवर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि परराष्ट्र मंत्रालयाला टॅग करत मदतीची विनंती केली आहे. त्यांनी जहाजावरील सीसीटीव्ही फुटेज, सार्थकच्या खासगी वस्तूंची तपासणी आणि कंपनीकडून पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.
सरकारची भूमिका
ओडिसा सरकारने या प्रकरणाची दखल घेतली असून नवी दिल्लीतील संबंधित विभागांशी संपर्क साधला आहे. केंद्र सरकार, परराष्ट्र मंत्रालय आणि मॉरिशसचे मॅरीटाइम रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर यांच्या माध्यमातून संयुक्त शोधमोहीम सुरू आहे. मात्र, घटनेला अनेक दिवस उलटूनही सार्थक यांचा सुगावा न लागल्याने चिंता वाढत आहे.